बंगळुरू : अवघा देश ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो आता जवळ आला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ आज समोर येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:देखील या क्षणाचे साक्षीदार होतील. पीएम मोदी शुक्रवारी रात्री बंगळुरूमधील इस्रो सेंटरमध्ये पोहोचतील. येथे शालेय मुलांसमवेत ते हा ऐतिहासिक क्षण पाहणार आहेत.
चांद्रयान-२ चा विक्रम लँडर आज चंद्रावर उतरेल तेव्हा सुरुवातीचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. लँडिंग प्रक्रिया मध्यरात्रीनंतर 1 च्या सुमारास सुरू होईल, जी 7 सप्टेंबर सकाळीपर्यंत सुरू राहील. आणि यामुळेच सर्वांची धडधड वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्रथमच भारत आपल्या एका यानाची सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
6 सप्टेंबरची रात्र अन् 7 सप्टेंबरची पहाट…
रात्री 01.30 ते 01.40 वाजेपर्यंत
चांद्रयन-2 चा विक्रम लँडर 35 कि.मी. उंचीवरून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खाली उतरण्यास सुरुवात होईल. यावेळी याचा वेग 200 मीटर प्रतिसेकंद असेल. इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी हे एक अतिशय आव्हानात्मक काम असेल. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरणार आहे.
रात्री 01:55 वाजता
विक्रम लँडर दक्षिण ध्रुवावरील मॅग्निनस-सी आणि सिम्पेलियस-एन या दोन खड्ड्यांच्या दरम्यान असलेल्या मैदानात उतरेल. 6 किमी उंचीपासून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रतिसेकंद 2 मीटरच्या वेगाने उतरेल. यावेळी एकूण पंधरा मिनिटे लागतील.
रात्री 03.55 वाजता
चंद्रावर उतरल्याच्या 2 तासांनंतर विक्रम लँडरचा रँप उघडेल. याच्याच साह्याने 6 चाकांचे प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरणार आहे.
7 सप्टेंबर पहाटे – 05.05 वाजता
प्रज्ञान रोव्हरचे सौर पॅनेल उघडतील. सौर पॅनेलद्वारे ऊर्जा प्राप्त करून कार्य संचालनाला आरंभ होईल.
05.10 वाजता
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्यास सुरुवात करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर 1 सेंटिमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने 14 दिवस या रोव्हरचा प्रवास होणार आहे. या मोहिमेत एकूण 500 मीटर अंतरावर रोव्हरचा संचार होईल.
चंद्रयान -2 तीन प्रमुख भागांनी बनलेले आहे. 1 – ऑर्बिटर, 2- विक्रम लाँडर, 3- प्रज्ञान रोव्हर.
– विक्रम लँडरच्या आत प्रज्ञान रोव्हर आहे, जे सॉफ्ट लँडिंगनंतर बाहेर पडेल.
– चांद्रयान -2 चा ऑर्बिटर चंद्राच्या वर सुमारे 140 किमी अंतरावर फिरत राहील. याद्वारे 2 वर्षांपर्यंत हे ऑर्बिटर चंद्राची छायाचित्रे पाठवेल.
– रशिया, अमेरिका आणि चीननंतर हे यश मिळवणारा भारत चौथा देश बनेल.
– चांद्रयान-2 ची लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 74 मुलेही पाहणार आहेत. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून या मुलांची निवड करण्यात आली आहे.





























WhatsApp