Home बातम्या आंतरराष्ट्रीय China @ 70 : पोलिसांच्या बंदीला हाँगकाँगच्या आंदोलकांचे आव्हान

China @ 70 : पोलिसांच्या बंदीला हाँगकाँगच्या आंदोलकांचे आव्हान

0

चीनमधल्या कम्युनिस्ट प्रशासनाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्याच दिवशी आंदोलनांवरील बंदीचा निषेध म्हणून हाँगकाँगमध्ये हजारो लोक निदर्शनं करत आहेत.

पोलिसांनी निदर्शकांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला हाँगकाँगमध्ये तब्बल चार महिन्यांपासून आंदोलनांद्वारे आव्हान देण्यात येत आहे.

प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या खास सोहळ्यासाठी चिनी झेंडा फडकवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, तसंच तब्बल 12,000 आमंत्रित पाहुण्यांनी कॉन्फरन्स असलेल्या केंद्रातून कार्यक्रमाचा लाइव्ह व्हीडिओ पाहिला.

आंदोलकांनी ‘दुःखाचा दिवस’ असं या वर्धापनदिनाचं वर्णन केलं. ते सेंट्रल हाँगकाँग आणि इतर सहा जिल्ह्यांमधून रस्त्यांवर उतरले होते. अनेक भागांतील रस्ते त्यांनी बंद केले.

आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला तसंच त्यांच्यावर रबराच्या गोळ्याही झाडल्या. याशिवाय पोलिसांकडे वॉटर कॅनन, लाठ्याही होत्या. आंदोलकांनीही पोलिसांच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले.

या आंदोलनात किमान 51 लोक जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

शहरातली तब्बल 15 मेट्रो स्टेशनं आणि शॉपिंग सेंटर बंद करण्यात आली आहेत आणि या प्रदेशात तब्बल 6,000 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय वर्धापनदिनानिमित्त आतषबाजी कऱण्यात येणार होती, ती रद्द करण्यात आली आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे?

स्वतंत्र कायदा यंत्रणा आणि प्रशासन असलेला हाँगकाँग 1997 सालापासून चीनचा भाग झाला. एकाच देशातील दोन यंत्रणा अशी सध्याची इथली परिस्थिती आहे.

गेल्या काही वर्षांपासून, हाँगकाँगच्या समाज आणि राजकारणावर बीजिंगचा प्रभाव वाढत आहे, यामुळेच हा विरोध करण्यात येत आहे.

हाँगकाँग नेहमीच 1 ऑक्टोबर रोजी बीजिंगविरोधी निदर्शनं करतो. प्रत्यार्पण कायद्यात होऊ घातलेल्या बदलांमुळे काही महिन्यांपासून अशांतता निर्माण झाली होती, म्हणूनच या वर्षी लोकांनी सर्वात मोठे आंदोलन केले.

या नव्या बदलांमुळे हाँगकाँगपासून चीनच्या मुख्य भूमीपर्यंत लोकांना आणणं शक्य झालं असतं. परंतु विरोधकांच्या मते यात हाँगकाँगवासियांवर नक्कीच अन्याय होऊ शकला असता.

साधारण चार महिन्यांपासून लाखोंच्या संख्येने निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. कायद्यात प्रस्तावित असलेले बदल अधिकृतपणे रद्द करण्य़ात आले आहेत. पण तरीही अशांतता रोखण्यास यश आलेले नाही आणि आता हाँगकाँगच्या भविष्यातील असित्वाची लढाई सुरु झाली आहे.

कोण आहेत हाँगकाँगमधील आंदोलक ?

हाँगकाँगचे आंदोलक प्रामुख्यानं तरूण आहेत, त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली आहे. सार्वत्रिक मताधिकार आणि पोलिसांच्या वागण्याची चौकशी या आंदोलकांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.

या निषेधाला प्रथम शांततेत सुरुवात झाली. परंतु काही आठवड्यातच या आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. टोळ्या आणि गुप्त पोलीस अधिकारी यांच्या सहभागामुळे आंदोलकांमध्ये भीती, अविश्वास आणि संशय निर्माण झालेला आहे.

हाँगकाँग चीनचा भाग आहे, परंतु या प्रदेशाला ‘विशेष स्वातंत्र्य’ मिळाले असून ते 2047 मध्ये संपुष्टात येणार आहे. हाँगकाँगमधल्या असंख्य नागरिकांना केवळ ‘एक चिनी शहर’ म्हणून राहायचे नाही.