Home बातम्या आंतरराष्ट्रीय China Coronavirus: कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

China Coronavirus: कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

0

बीजिंग: चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या मृतांचा आकडा हजारोंमध्ये असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनमधली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या टेनसेंटनं कोरोना विषाणूमुळे २४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली. मात्र काही वेळातच टेनसेंटनं ही आकडेवारी संकेतस्थळावरुन हटवली. तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीन सरकारनं दिली. 

कोरोना विषाणूमुळे २४ हजार ५८९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी टेनसेंटनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. तत्पूर्वी चीन सरकारनं मृतांचा आकडा ५६३ असल्याची अधिकृत आकडेवारी दिली असल्यानं टेनसेंटनं दिलेली माहिती पाहून अनेकांना धक्का बसला. यानंतर टेनसेंटच्या संकेतस्थळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र थोड्याच वेळात टेनसेंटनं आकडेवारीत बदल केला. सरकार कोरोनाशी संबंधित माहिती लपवत असल्याचा आरोप यानंतर कम्युनिस्ट पक्षानं केला.

तैवान न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार अनेक देशांमध्ये आपलं जाळं विस्तारलेल्या टेनसेंटकडून चुकून कोरोना विषाणूबद्दलची माहिती लीक झाली. चीनमधल्या तब्बल १ लाख ५४ हजार २३ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून मृतांचा आकडा २४ हजार ५८९ असल्याची आकडेवारी टेनसेंटनं दिली. काही वेळातच ही आकडेवारी टेनसेंटनं संकेतस्थळावरुन हटवली. कोरोनाची बाधा १४ हजार ४४६ जणांना झाली असून ३०४ जणांचे प्राण गेल्याची नवी आकडेवारी यानंतर टेनसेंटनं दिली. 

सोशल मीडियावर याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कोडिंगमध्ये गोंधळ झाल्यानं चुकीचा आकडा प्रसिद्ध झाला असावा, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. तर काहींनी टेनसेंटकडून चुकून खरी आकडेवारी लीक झाल्याचा दावा केला. जगभरातील लोकांना कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा खरा आकडा समजावा, यासाठी टेनसेंटच्या एखाद्या कर्मचाऱ्यानं मुद्दामहून हा आकडा प्रसिद्ध केला असावा, असादेखील तर्क काहींनी बांधला.