बीजिंग :चीनमध्येकोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 1770 लोक मृत्युमुखी पडले असून 70,548 पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारतातील औषधांच्या किमती वाढल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे भारतात पॅरासिटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत 40 ते 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलची किंमत जवळपास 40 टक्के वाढली आहे. तर अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसात कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर अडचण होऊ शकते.