Home ताज्या बातम्या China Coronavirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

China Coronavirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

0

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे झालेला आजार बरा करण्याकरीता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या संदेशांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य विभागामार्फत असे संदेश दिले नाहीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमुत्र आदींच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसवर उपचार शक्य असल्याचा संदेश वेगवेगळ्या डॉक्टरांच्या नावाने आणि आरोग्य विभागाचे नाव टाकून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. दिशाभूल करणाऱ्या या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ताजे अन्न, स्वच्छ व पूर्णपणे शिजविलेले अन्न खावे, पोषक आहार घ्यावा, हात धुवावेत, सर्दी किंवा खोकला झाला असल्यास नाका तोंडावर रुमाल ठेवून शिंकावे अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.

कोरोनावर कुठलेही एक विशिष्ट औषध उपचार म्हणून नसून लक्षणांवर औषधोपचार केला जातो, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 492 लोक मृत्युमुखी पडले असून 20 हजार 400 जणांना त्याची लागण झाली आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. एअर इंडियाने चीनमधील शहरांत जाणारी विमाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची विमाने 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात चीनला जाणार नाहीत. दुसरीकडे चीनचे नागरिक तसेच चीनचा पासपोर्ट बाळगणारे अन्य देशांचे नागरिक यांना भारतात प्रवेश करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे.