हायलाइट्स:
- चीनचे ‘लाँग मार्च ५बी’ रॉकेट अंतराळात अनियंत्रित
- रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत येण्याची शक्यता
- रॉकेट नागरी भागात कोसळण्याची भीती
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अवकाश नियंत्रण गमावलेले चीनचे रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करू शकतो. सॅटेलाइट ट्रॅक करणाऱ्यांनी सांगितले की, १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेला रॉकेट ४ मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. या रॉकेटला त्यांनी 2021-035B हे नाव दिले आहे.
वाचा चीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले
वाचा:‘भारत-ब्राझीलमधील अपयशी राजकीय नेतृत्वामुळे करोनाचे थैमान’
अमेरिकन संरक्षण खात्याचे प्रवक्ते माइक हावर्ड यांनी सांगितले की, अमेरिकेचे स्पेस कमांड चीनच्या लाँग मार्च ५बी रॉकेटवर लक्ष ठेवून आहे. हे रॉकेट नेमकं कुठं कोसळणार याबाबत ठोसपणे आताच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत आल्यानंतर याबाबत भाष्य करता येईल. हे रॉकेट ८ मे रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खगोल शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवल यांनी स्पेस न्यूजला सांगितले की, सॅटलाइटच्या मार्गावर न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग, चिली, न्यूझीलंड आहे. या भागात हे रॉकेट कुठेही कोसळू शकते. नागरी वस्ती असलेल्या भागात रॉकेट कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या रॉकेटचा बराचसा हिस्सा जळून खाक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा: आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला
अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली आहे.