Home अश्रेणीबद्ध Copa America 2021 : अर्जेंटिनाने इतिहास रचला; लिओनेल मेस्सीवरील ओझं उतरलं

Copa America 2021 : अर्जेंटिनाने इतिहास रचला; लिओनेल मेस्सीवरील ओझं उतरलं

0
Copa America 2021 : अर्जेंटिनाने इतिहास रचला; लिओनेल मेस्सीवरील ओझं उतरलं

रियो दि जानेरो : रविवारी सकाळी कोपा अमेरिका फायनलमध्ये इतिहास घडला. १९९३ नंतर पहिल्यांदाच अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेचं विजेतेपद जिंकलं. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा १-० असा पराभव करून जेतेपद मिळवून देणं ही इच्छा त्यांची आज पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय संघासाठी कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही, म्हणूनच स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीवर बरंच ओझं होतं, ते आता उतरलं आहे.

रिओ डी जानेरोच्या माराकाना स्टेडियमवर 22 व्या मिनिटाला अँजेल डी मारियाने अर्जेटिनासाठी विजयी गोल केला. त्याने रॉड्रिगो डी पॉलने दिलेल्या पासचे गोलमध्ये रूपांतर केले. 33 वर्षीय मारिया या अनुभवी स्ट्रायकरने कमकुवत बचावाचा फायदा घेतला आणि गोलकीपर अँडरसनला चकवत गोल केला. सामना संपल्यानंतर अर्जेंटिना संघातील खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. मेस्सीला खांद्यावर उचलून या खेळाडूंनी आनंद साजरा केला. स्टेडियममधील काही चाहत्यांसोबतही मेस्सीने जल्लोष केला. त्यानंतर विजयी ट्रॉफीचे चुंबन घेऊन मेस्सीने आनंद व्यक्त केला. सेमीफायनलमध्ये कोलंबियाला पराभूत करणाऱ्या संघात अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी पाच बदल केले. या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाला पेनल्टीमध्ये पराभूत केले होते. अर्जेंटिनाने जरी सामना जिंकला असला तरी अंतिम सामन्यात मेस्सीची कामगिरी मागील सामन्यांइतकी चांगली नव्हती. गेल्या काही सामन्यात त्याने चार गोल केले आणि पाच गोलसाठी मदत केली होती. सामन्याच्या 88 व्या मिनिटाला त्याच्याकडे गोल करण्याची संधी होती. पण ब्राझीलच्या गोलकीपरने त्याला रोखले.

राष्ट्रीय संघासाठी मेस्सी कोणतेही विजेतेपद जिंकू शकला नाही, अशी टीका अनेक वर्षांपासून होत होती. आज त्याला मेस्सीने पूर्णविराम दिला आहे. दक्षिण अमेरिकेतील या स्पर्धेचं जेतेपद अर्जेंटिनासाठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे. जेव्हा मेस्सी 6 वर्षांचा होता, तेव्हा अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेचं जेतेपद जिंकलं होतं. शनिवारी जिंकलेलं कोपा अमेरिकेचं जेतेपद अर्जेंटिनासाठी 15 वं जेतेपद ठरलं आहे. या जेतेपदासह अर्जेंटिनाने उरुग्वेशी बरोबरी केली आहे. ब्राझीलने 9 वेळा जेतेपद जिंकलं आहे.

Source link