हायलाइट्स:
- मुंबईत आज ८६६ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.
- १ हजार ४५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.
- अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत आली खाली.
वाचा:मुंबईत नव्या गाइडलाइन्स; सोमवारपासून काय ‘अनलॉक’ होणार जाणून घ्या
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजची करोनाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या कमी झाली आहे. शुक्रवारी मुंबईत ९७३ नवे रुग्ण आढळले होते तर आज ८६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यासोबतच आज १ हजार ४५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत २९ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा १५ हजारांच्यावर गेला आहे. १५ हजार १८ जणांचा आतापर्यंत करोनाने बळी घेतला आहे.
वाचा: लोकलवरील निर्बंधांबाबत मोठी बातमी; मुंबई महापालिकेला मिळाली ‘ही’ पॉवर
मुंबईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १६ हजार १३३ इतकी कमी झाली आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५११ दिवसांवर गेला आहे. २९ मे ते ४ जून या दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के राहिला आहे. मुंबईत आज एकूण २६ हजार ६६९ कोविड चाचण्या करण्यात आल्या. झोपडपट्टी आणि चाळीत आता २७ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सील असलेल्या इमारतींची संख्या ११६ पर्यंत कमी झाली आहे.
…तर मुंबईला मिळणार मोठा दिलासा
मुंबईतील करोना पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा थोडा जास्त असल्याने अनलॉकच्या लेव्हल- ३ मध्ये मुंबईचा तूर्त समावेश राहणार आहे. याबाबतचे नवे आदेश सोमवारपासून लागू होणार आहेत. त्यात अनेक निर्बंध मर्यादित स्वरूपात शिथील केले जाणार आहेत. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आरोग्य विभाग पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची स्थिती जाहीर करणार आहे व त्यापुढच्या सोमवारपासून नवे आदेश राहणार आहेत. हे सूत्र पाहता मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आल्यास व ऑक्सिजन बेड्सबाबतचे निकष पूर्ण होत असल्यास १४ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात मुंबईचा लेव्हल-२ मध्ये समावेश होऊन खूप मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
वाचा: करोनाचा विळखा आणखी सैल; तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्णांचे निदान