हायलाइट्स:
- क्वारंटाइन व्यक्तींच्या हाताच्या बोटावर शाई लावणार.
- पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले कारण.
- गाव समित्याही पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार.
वाचा: साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन; काय बंद, काय सुरू राहणार पाहा…
उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. काही करोना बाधित रुग्णांना होम आइसोलेट केले जात आहे. तसेच बाहेरगावाहून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींनाही क्वारंटाइन केले जात आहे. या सर्वांच्या हातावर शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणारी शाई सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आता शिक्क्याऐवजी हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. होम आइसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या डाव्या हाताच्या बोटाला तर होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाणार आहे. अशी शाई लावलेली व्यक्ती बाहेर फिरताना दिसली तर अशा व्यक्तीची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी. अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री उदय सामंत यानी स्पष्ट केले. ५ मे पासून पुन्हा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गाव समित्या पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
वाचा: वडिलांपेक्षा अधिक मते मिळूनही भगीरथ पराभूत; राष्ट्रवादीला ‘या’ चुका भोवल्या
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ४ मे पासून लसीकरण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केवळ ५००० एवढ्या लस उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हासाठी आवश्यकतेपेक्षा कमी लस प्राप्त झाल्याने दर दिवशी १०० लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे अशांनाच ही लस दिली जाणार असल्याने ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही व पहिल्या शंभरमध्ये ज्यांचे नाव नाही अशा व्यक्तींनी लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. लसचा मुबलक साठा येईल तेव्हा आरोग्य उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत तालुकास्तरावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले असून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
वाचा: सांगलीत उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू; ‘त्या’ गावांतही सर्व व्यवहार बंद
जिल्हा रुग्णालयात कोणताही स्फोट झाला नाही
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी स्फोट होऊन आगीचा भडका उडाला अशा बातम्या आल्या होत्या. मात्र, असा कोणताही स्फोट किंवा आगीचा भडका उडालेला नाही. ऑक्सिजन सिलिंडर जोडताना लिकेज होणाऱ्या ऑक्सिजनचा मोठा आवाज झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट होणे स्वाभाविक आहे. परंतु, ऑक्सिजन प्लांटमध्ये कोणतीही बाधा नाही. काही वेळानंतर ऑक्सिजन प्लांट पूर्ववत सुरू करण्यात आला. दिल्ली व गुजरात येथील तज्ञ व्यक्तींचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली जात आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळपासून जिल्हा रुग्णालयात उपस्थित आहेत, असे सामंत यांनी नमूद केले.
वाचा: रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले आणि…
पत्रकारसाठी स्वतंत्र कॅम्प घेणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील कार्यरत पत्रकारांची यादी आपल्याकडे सादर करावी. त्यांच्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्यात येईल, असे यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
अनावश्यक फी घेतली जाणार नाही
कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून अनावश्यक फी घेतली जाणार नाही. त्यांच्याकडून लायब्ररी, जीम यासाठीची शुल्क आकारणी केली जाणार नाही. यासाठी बुधवारी होणाऱ्या बैठकीत आपण आदेश देणार असल्याचे उदय सामंत यांनी नमूद केले.
वाचा: रेमडेसिवीर: सुजय विखेंचीही कोर्टात धाव; केला हा दावा, इतर नेतेही अडचणीत