हायलाइट्स:
- कोविड लसीककरणात वशिलेबाजीने केला शिरकाव.
- नगर शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे उघड.
- मनसेने दणका देताच लसीकरण सुरळीतपणे सुरू.
वाचा: नागपुरात करोनात दुहेरी जनुकीय बदल; विषाणूचे पाच नवे प्रकार
अन्य शहरांप्रमाणेच नगरमध्येही करोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने दोन भाग करून लसीकरण सुरू केले आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना केवळ दुसरा डोस देण्यात येत आहे. यासाठी वेगळी तीन केंद्र सुरू केली आहेत. तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी वेगळी केंद्रे ठेवण्यात आली आहेत. तेथेही दररोज खूपच कमी लससाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे खटके उडू लागले आहेत.
वाचा: सांगलीत उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू; ‘त्या’ गावांतही सर्व व्यवहार बंद
माळीवाडा येथील मनपाच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी तरुणांच्या सकाळपासूनच रांगा लागत आहेत. त्यात काही नगरसेवक व राजकारणी मंडळी त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना लस देण्यासाठी दबाव आणत आहेत तर काही जण धमक्याही देत आहेत. त्यातून रांगेतील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून या स्थितीत काम करू शकत नाही असे सांगत लसीकरणाचे कामच बंद ठेवले.
वाचा: बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…
हा प्रकार बाहेर रांगेत उभ्या नागरिकांना समजला. सकाळपासून उभे असूनही लस मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मनसेचे जिल्हा चिटणीस नितीन भुतारे यांच्या पुढाकारातून रांगेतील नागरिकांनी तेथेच रस्ता रोका आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळाल्यावर तेथे पोलीस आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बंद केलेले लसीकरणाचे काम पुन्हा पोलीस बंदोबस्तात सुरू झाले. नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून काही नगरसेवकांनी आपल्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, आता लस तुटवडा आणि दुसरीकडे गर्दी वाढत असल्याने त्यातही वशिलेबाजी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सध्या खासगी रुग्णालयांत लस उपलब्ध नाही. सरकारी केंद्रांवर मागणीपेक्षा कमी पुरवठा होत आहे. अनेकांचा दुसरा डोस बाकी आहे, तर दुसरीकडे तरुणांकडून मोठ्या संख्येने नोंदणी होत आहे. त्यामुळे सर्वच केंद्रांवर मोठा ताण आला आहे.
वाचा: रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले आणि…