Home बातम्या Delhi Election Results : …म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे ‘कृष्ण’

Delhi Election Results : …म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे ‘कृष्ण’

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. अशा प्रकार केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. 2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसारखंच यंदा आपनं मोठा विजय मिळवला.

केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणामध्ये झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात गोविंदराम आणि गीता देवी यांच्या पोटी अरविंद यांचा जन्म झाला. केजरीवाल यांच्या बालपणीचा बरासचा काळ सोनपत, गाझियाबाद आणि हिस्सार परिसरामध्ये गेला. हिस्सारच्या कॅम्पस स्कूल आणि सोनपतच्या ख्रिश्चन मिशनरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. केजरीवाल यांचा जन्म झाला त्यादिवशी कृष्ण जन्माष्टमी होती. केजरीवाल परिवाराने मोठ्या उत्साहाने कृष्ण जन्माष्टमी साजरी केली होती. त्यामुळे केजरीवाल कुटुंबीय अरविंद केजरीवाल यांना लहानपणी ‘कृष्ण’ या नावानेच हाक मारत असे. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीचे शिक्षण घेतले. सन 1989 मध्ये जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये केजरीवाल यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. 1992 मध्ये नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी टाटा स्टीलला सोडचिठ्ठी. त्यानंतर 1995 मध्ये भारतीय महसुली खात्याच्या (आयआरएस) सेवेसाठी निवड. आयकर विभागात सहआयुक्त म्हणून कामाचा अनुभव केजरीवाल यांच्य पाठीशी आहे. भारतीय महसुली खात्याच्या सेवेत असतानाच डिसेंबर 1999 मध्ये मनीष सिसोदिया आणि अन्य साथीदारांबरोबर दिल्लीत ‘परिवर्तन’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
2012 नोव्हेंबरमध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली आणि पहिल्यांदा निवडणूक लढताना या पक्षाने 70 पैकी 28 जागा जिंकल्या. दिल्लीमध्ये भाजपाने 31 आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्याने विधानसभा त्रिशंकु राहिली. आपने सरकार स्थापनेसाठी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आणि अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि आपचे संबंध बिघडले आणि केजरीवालांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांनी राजीनामा दिला. हे सरकार केवळ 49 दिवस चाललं. 
निवडणूक आयोगाने 12 जानेवारी 2015 रोजी दिल्लीत निवडणुकांची घोषणा केली. आपचे प्रवक्ते राघव चड्ढा यांनी त्याच दिवशी ‘केजरीवाल ऐतिहासिक रामलीला मैदानातून 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील आणि ते दिल्लीचे व्हॅलेंटाईन बनतील’ अशी घोषणा केली होती.  त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालं आणि 10 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. आपने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या व भाजपाला अवघ्या तीन जागांवर रोखलं. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. नंतर राघव चड्ढा यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे केजरीवालांनी रामलीला मैदानातून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.