Dombivali Factory Fire: डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, संपूर्ण परिसरात काळा धूर

- Advertisement -

डोंबिवली: शहरातील एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे, अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीमुळे आसपासच्या परिसरात संपूर्ण काळा धूर पसरलेला आहे. कामगारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी काही जणांना घरी सोडलं आहे. 

डोंबिवली एमआयडीसीत लागलेल्या या आगीमुळे पुन्हा एकदा डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या भागात पाहणी केली होती. त्यावेळी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या कंपन्यांना टाळे लावा असे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला आठवडाभरातच केराची टोपली दाखवली असून निष्काळजीपणा करणाऱ्या अशा कंपन्यांना डोंबिवलीतून हाकलून द्या अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे. 

तर माहिती अधिकारात मिळालेल्या नुसार डोंबिवलीतील पाच अतिधोकादायक असलेल्या कंपनी पैकी मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेड ही आहे. याच कंपनीत मोठी आग लागली आहे. सदर धोकादायक कंपन्या स्थलांतर करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटीत मी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली होती. परंतु काही राजकीय नेत्यांनी व कारखानदारांनी कामगार बेकार होतील असे भयानक राजकारण केले आहे असा आरोप राजू नलावडे यांनी केला असून  डोंबिवलीच्या सुरक्षेसाठी सदर अतिधोकादायक पाच कंपन्या ताबडतोब स्थलांतरित करणे अत्यावश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला आहे. कंपनीत केमिकल साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. अद्याप घटनेत कोणी जखमी आहे की नाही ते स्पष्ट झाले नाही. कंपनीत नेमकी आग कशामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही, सध्याच्या  प्राथमिक माहितीनुसार  जीवितहानी नाही, पूर्णपणे माहिती घेणे, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे अशी माहिती केडीएमसीचे अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. 

- Advertisement -