Home बातम्या Dussehra 2019 : भाईंदरच्या तारोडी गावातील धारावी देवी

Dussehra 2019 : भाईंदरच्या तारोडी गावातील धारावी देवी

0

तारोडी पासून गोराई पर्यंतची डोंगराची धार म्हणुन ओळखला जाणारे धारावी बेट आणि या बेटावरील स्वयंभु पुरातन देवीचे स्थान म्हणुन धारावी देवी अशी ओळख भाईंदरच्या तारोडी गावातील धारावी मंदिराची आहे. निसर्गरम्य डोगराच्या मध्यावर असलेलं देवीचं मंदिर हे कोळी, आगरी तसेच स्थानिक भुमिपुत्रांचे हे जागृत दैवत आहे. पण आज सर्वच जाती धर्मातील लोकं धारावी देवीला आपली राखणदार व जागृत दैवत म्हणुन मान देतात, पुजा अर्चा व नवस करतात. देवीचे मंदिर असले तरी एका कोळ्याला दिलेल्या दृष्टांता मुळे येथे शंकराचा देखील निवास असल्याने महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. तारोडी गावात ख्रिस्ती धर्मियांची वस्ती जास्त असली तरी गावच्या वेशीवरील स्वयंभु अशा धारावी देवीला पुर्वी पासुन मानणारे ग्रामस्थ आहेत. तारोडी, डोंगरी, पाली, उत्तन, गोराई, मनोरी हा परिसर पुर्वी पासुन समुद्र आणि खाडी दरम्यान असलेली डोंगराची धार म्हणुन धारावी बेट असा ओळखला जातो. चौक येथे चिमाजी अप्पांचा काळातील बांधकाम करण्यास घेतलेल्या किल्लयाची देखील धारावी किल्ला या नावाने नोंद आहे. याच बेटावरील भार्इंदरचे तारोडी गाव हे मुळचे पुर्वापार असलेले गाव आहे. या गावच्या वेशीवर डोंगराळ भागात असलेले धारावी देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणुन ओळखले जाते.

देवीची मुर्ति ही अखंड दगडातुन कोरलेली स्वयंभु आहे. तारोडी गावच्या वेशीवर असलेल्या या स्वयंभु देवतेला स्थानिक ग्रामस्थ मानत आले आहेत. कालांतराने ख्रिस्ती धर्मिय झाले असले तरी येथील ग्रामस्थ धारावी देवीला मानत तसेच देखभाल करत असे गावातील जाणकार सांगतात. पण तारोडी गावातील हल्लीच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या धर्माच्या अनुषंगाने धारावी देवी अन्य धर्मियांची म्हणुन पाहिले जाते या बद्दल ज्येष्ठ – जाणकार ग्रामस्थ खंत देखील व्यक्त करतात.

ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी देवीचे लहानसे मंदिर बांधले गेले होते. त्यावेळी ब्रिटिश शासनातील कस्टम विभाग मंदिराचे व्यवस्थापन आदी करत असे. आजही कस्टम विभागास देवीच्या उत्सव, पालखी वेळी मान दिला जातो. नायगावच्या पालीची १८ डिसेंबरची मोठी यात्रा झाली की दुसराया दिवशी १९ डिसेंबरला धारावी देवीचा मोठा सण पुर्वी होत असे. मीरा भार्इंदर मधील ग्रामस्थच नव्हे तर नायगाव, पाचुबंदर पासुन अनेक कोळीवाड्यातील कोळी तसेच आगरी समाज खाडी मार्गे बोटींनी त्यावेळच्या तारोडी धक्कायाला उतरुन देवीच्या दर्शनाला सहकुटुंब येत असत. आपापले नवस फेडुन देवीला प्रथे प्रमाणे मान देत असतात.

अख्यायीका सांगीतली जाते की, ज्या एका कोळयाने धारावी आईची प्राणप्रतिष्ठा केली त्याला तुंगारेश्वर येथील महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेण्याची इच्छा मनात आली होती. महाशिवरात्री जवळ आली असता त्याने तुंगारेश्वर येथे महादेवाचा दर्शनाला जाण्याची तयारी चालवली होती. त्यावेळी देवीने, महादेवाच्या दर्शनासाठी तुंगारेश्वरला जाण्याची गरज नसुन मीच महादेवाची अर्धांगीनी गिरीजा, उमा, गौरी आणि पार्वती आहे. त्यामुळे माझ्या मध्येच तुला शंभू महादेवाचे दर्शन होईल असे सांगीतले. त्यानंतर त्या कोळ्याला देवीच्या रुपात महादेवाचे दर्शन झाले आणि तेव्हा पासुन सुरु झालेला धारावी देवीच्या मंदिरातील महाशिवरात्रीला उत्सव आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

धारावी मंदीर संस्थे तर्फे शारदीय नवरात्र उत्सव देखील पारंपारीक पध्दतीने साजरा करण्यात येतो. पहाटे देवीची काकड आरती तसेच अभिषेक घातला जातो. दुपारची आरती, सायंकाळी महाआरती भक्तगणांच्या मार्फत केली जाते. रात्री भजन व किर्तनाचे आयोजन असते. नवरात्रीत पुजेचा मान गावातील नवदाम्पत्याला दिला जातो. केवळ मीरा भार्इंदरच नव्हे तर अनेक भागातुन धारावी देवीच्या दर्शनाला भाविक येत असतात.