Home ताज्या बातम्या IASच्या तयारीसाठी गेला होता दिल्लीला, तिसऱ्यांदा बनला आपचा आमदार

IASच्या तयारीसाठी गेला होता दिल्लीला, तिसऱ्यांदा बनला आपचा आमदार

0

नवी दिल्लीः देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा आपनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ला  एकहाती सत्ता दिली. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आपचा विजय झाला असून, भाजपाला फक्त आठ जागा राखता आल्या आहेत. तर काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही. विशेष म्हणजे आपच्या विजयानंतर उत्तर प्रदेशमधल्या संतकबीरनगर जिल्ह्यात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. याचं कारणही खास आहे. 

खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत संतकबीरनगरमधले मेंहदावलचे रहिवासी अखिलेश त्रिपाठी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ते मॉडल टाऊन जागेवरून सलग तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आमदार झाले आहेत. अखिलेश यांनी आपच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपाच्या कपिल मिश्रा यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. अखिलेश हे दिल्लीत आयएएसच्या तयारीसाठी आले होते. मुलगा आमदार झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांसह जिल्ह्यातील लोकांनी आनंद साजरा केला आहे.

सेवानिवृत्त झालेले शिक्षक वडील अभयनंदन त्रिपाठी म्हणाले, जो पक्ष देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, त्या पक्षासोबत माझा मुलगा असल्यानं मी आनंदी आहे. मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून विजयी झालेले अखिलेश हे आपच्या संस्थापक सदस्य नेत्यांपैकी एक आहेत. ते पहिल्यांदा 2013मध्ये, त्यानंतर 2015मध्ये आणि आता 2020मध्ये आपकडून मॉडल टाऊन जागेवरून निवडणुकीत उतरले आणि विजय झालेले आहेत.

प्रत्येक वेळी ते चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. संतकबीरनगरमधल्या अखिलेश त्रिपाठी यांनी 1998मध्ये शालेय शिक्षण आणि 2000मध्ये इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईसीसी कॉलेज इलाहाबादमधून 2003मध्ये बीए आणि वर्षं 2005मध्ये प्राचीन इतिहास विषयावर अध्यापन केलं आहे. 2006मध्ये इलाहाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. वर्षं 2007मध्ये दिल्लीत आयएएसची तयारी करण्यासाठी आले होते. 

दिल्लीत गेल्यानंतर अखिलेश अण्णा हजारेंच्या आंदोलनानं प्रभावित होऊन त्यांच्याशी जोडले गेले. त्याचदरम्यान ते एका सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे अरविंद केजरीवालांसोबत जोडले गेले. आपकडून त्यांना मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आणि जनतेनंही त्यांच्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे.