हायलाइट्स:
- इंडियन आयडल १२ च्या आगामी भागात शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा प्रमुख पाहुणे
- इंडियन आयडल १२ चा पुढचा भाग मान्सून स्पेशल
- अरुणिता आणि पवनदीपसाठी हा भाग असणार संस्मरणीय
इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा आगामी भाग मान्सून स्पेशल असणार आहे. आगामी भागामध्ये अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. परीक्षक अनु मलिक यांनी अरुणिताचे गाणे ऐकले आणि तिला चक्क सेटवर भजी करायला सांगितले. मग अरुणिताने देखील सेटवर भजी करून सर्वांना खायला घातली.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने अरुणिताने तयार केलेल्या भजी एका प्लेटमध्ये घेऊन पवनदीप जवळ गेला. त्याला हसून म्हणाला, ‘मी तुला माझ्या हाताने भजी खायला घालतो. अरुणिता तू देवाकडे प्रार्थना कर की पवनदीपला अशाच कुणाच्या तरी सुंदर हाताने भजी खायला मिळू देत.’
त्यावर पवनदीप म्हणाला, ‘सध्या पावसाचा मौसम सुरू आहे. पाऊस दरवर्षी येतो, परंतु दरवर्षी येताना तो नेहमी काही तरी नवीन घेऊन येतो. माझ्यासाठी देखील यंदाचा पाऊस काही तरी खास घेऊन आला आहे. मला असे वाटते आहे की मी प्रेमात पडलो आहे…’ हे ऐकून सेटवर उपस्थित असलेले सर्व स्पर्धक, परीक्षक देखील आश्चर्यचकीत झाले. तर दुसरीकडे अरुणिता लाजलेली दिसली.
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी प्रेक्षकांना खूपच लोकप्रिय आहे. या दोघांचा आवाजही अनेकांना आवडतो. इंडियन आयडल १२ कार्यक्रमात पवनदीप आणि अरुणिताने अनेक गाणी एकत्र गायली आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी खास सुरू आहे, अशी चर्चा कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सुरू होती.
असे म्हटले जाते की पवनदीप आणि अरुणिता देखील एकमेकांना आवडतात. हे दोघेजण अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. पवनदीपने एका मुलाखतीमध्ये अरुणिताबरोबर असलेल्या खास नात्याबद्दल भाष्य केले होते. तो म्हणाला होता, ‘आम्हा दोघांमध्ये जे नाते आहे ते मित्रांसारखेच आहे. आमच्यामध्ये खूप छान मैत्री आहे, त्याला आणखी कोणतेही नाव देऊ नका.’