हायलाइट्स:
- इंडियन आयडल १२ मध्ये फादर्स डे स्पेशल भाग
- प्रत्येक स्पर्धकाने आपल्या वडिलांसाठी गायले गाणे
- शनमुखा प्रियाचे गाणे ऐकून परीक्षकही झाले प्रभावीत
इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण कार्यक्रमाचे परीक्षक अनु मलिक, सोनू कक्कर,हिमेश रेशमिया आणि सर्व स्पर्धकांसाठी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे. कार्यक्रमात सर्वाधिक ट्रोल झालेली स्पर्धक शनमुखाप्रियाने या भागामध्ये आपल्या वडिलांसाठी ‘भरे नैना…’ हे गाणे गायले. तिने ज्या अंदाजामध्ये गाणे सादर केले ते ऐकून तीनही परीक्षक अतिशय भारावून गेले आणि उभं राहून तिला दाद दिली.
परीक्षका हिमेश रेशमिया यावेळी म्हणाला, ‘तू खूपच सुंदररित्या हे गाणे गायले आहे. तू गाणे गात असताना त्यामध्ये मी पूर्णपणे हरवून गेलो आहे. या मंचावर तू पहिल्यांदाच शास्त्रीय गाणे सादर केले आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. शास्त्रीय गाणे अतिशय सुंदररित्या सादर केले आहेत, त्याबद्दल मी तुला सलाम करतो.’
कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने शनमुखा प्रिया आणि तिच्या वडिलांना मंचावर येण्याची विनंती केली. त्यानंतर हिमेश रेशमियासोबत त्यांना ‘सुरूर तेरा…’ या गाण्यावर नृत्य करण्याची विनंती केली. आदित्यने हे सांगितल्यानंतर शनमुखाप्रिया खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, ‘मला असं वाटतंय की हे सारं स्वप्नच आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गजांकडून अशा पद्धतीने मी सादर केलेल्या गाण्याला दाद मिळणे ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याहून भाग्याची गोष्ट अशी की, हा क्षण माझ्या वडिलांसोबत मला पाहता आला आहे. या सगळ्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.’
शनमुखाप्रियाला याआधी तिच्या गाण्याच्या एकूणच अंदाजामुळे सोशल मीडियावर युझर्सनी खूपच ट्रोल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे तिला कार्यक्रमाचे तीनही परीक्षक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायणकडून पाठिंबा मिळत आला आहे.
सोशल मीडियावर ट्रोल होत असण्याबद्दल शनमुखाने सांगितले की, ‘सोशल मीडियावर माझ्यावर जी काही टीका होते त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. कारण जितके टीकाकार आहेत, त्याहून अधिक माझे चाहते आहेत. माझ्या चाहत्यांकडून जे प्रेम मला मिळते त्यामुळे मला आनंद होतो, त्या आनंदामध्ये जे माझ्यावर टीका करतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करते…’ तिने पुढे असेही सांगितले की, ‘ख्यातनाम पॉप गायक मायकल जॅक्सनवर देखील खूप टीका झाली होती. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवत असल्याने माझे संपूर्ण लक्ष गाण्यावरच केंद्रीत करते.’