हाच वेगळेपणा त्यांच्या प्रेमात एक रांगडा बाज घेऊन येतो, मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे अशात तिच्यासोबतच जर साता जन्माच्या गाठी जुळल्या तर… असा कुठला नात्यांचा गुंता उद्भवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो. हे पाहण्यासाठी ‘जीव माझा गुंतला‘ ही नव्याने येऊ घातलेली मालिका २१ जूनपासून कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहता येईल.
आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत.
घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.