Home बातम्या आंतरराष्ट्रीय LOCवर भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची फे फे; इम्रान खाननी बोलावली NSCची बैठक

LOCवर भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची फे फे; इम्रान खाननी बोलावली NSCची बैठक

0

इस्लामाबाद: एकीकडे काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलेले असतानाच नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानची फे फे उडाली आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेवर तैनाती सैन्याला अलर्ट राहण्याची सूचना पाकिस्तानकडून जारी करण्यात आली आहे. तसेच देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथे राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली असून, त्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या आक्रमक कारवाईनंतर एलओसीवर भारताकडून क्लस्टर बॉम्बचा वापर झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी एक ट्विट केले असून, त्यात ते म्हणतात की,” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. सध्या त्याचीच वेळ आलेली आहे. मात्र भारतीय लष्कराच्या आक्रमक कारवायांमुळे नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडत आहे.” असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.दरम्यान, भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या डावपेचाला उत्तर देत पाकिस्तानचे 5 ते 7 जवान आणि दहशतवादी मारले. सीमा भागातून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराने उधळून लावलं. भारतीय लष्कराच्या कारवाईत जे दहशतवादी मारले गेले त्यांचे मृतदेह सीमेवर पडून आहेत. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे असतील तर पाकिस्तानी लष्कर हे मृतदेह घेऊन जाऊ शकते. मात्र त्यासाठी त्यांना सफेद झेंडा घेऊन यावं लागेल. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तान भेदरला आहे. भारतीय लष्कराने पुरावे म्हणून मृत दहशतवाद्यांचे फोटोही घेतले आहेत. पाकिस्तानकडून काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरु आहेत. गोळीबारीच्या आडून जैश ए मोहम्मदचे दहशतवादी सीमा भागातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितले.