मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता असून शिवसैनिकांचीही मोठी गर्दी अपेक्षित आहे. सुरक्षा आणि पाहुण्यांची सोय या दोन्ही दृष्टीने प्रशासनासह महाविकास आघाडीतील तीनही पक्ष तयारीला लागले आहेत.
पहिल्या युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा शपथविधी सोहळादेखील शिवाजी पार्कवर झाला होता. पक्ष स्थापना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभांपासून अगदी आदित्य ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशासारख्या शिवसेनेतील सर्व महत्त्वाच्या घटना शिवाजी पार्कच्या साक्षीनेच घडल्या. आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंंत्री पदाची शपथ घेत आहे. त्यानुसार साजेशी व्यवस्था उभारण्याची लगबग सुरू आहे.
शिवाजी पार्कवर ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीची कामे सुरू होती. आता, थेट शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. विविध यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे बुधवारी तीनवेळा व्यासपीठाची व्यवस्था बदलावी लागली. शेवटी दसरा मेळाव्याप्रमाणेच व्यासपीठ उभारण्याचा निर्णय झाला. ऐनवेळी झालेल्या या बदलांमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, महापालिका अशा विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एकूण ७० हजार लोक बसतील यादृष्टीने पार्कात व्यवस्था उभारण्यात येत आहे. तर, तब्बल १४० फूट लांब आणि ५० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. मंत्रिपदाची शपथ घेणारे आमदार, शपथ देणारे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना सामावून घेणारी त्रिस्तरीय व्यवस्था उभारण्यात येत आहे.
तीनशे जणांची आसनव्यवस्था व्यासपीठावर असणार आहे. तर, महाराष्ट्राचे प्रतिबिंब झळकेल अशी नेपथ्य रचना करण्यात येणार असून आठ फूट उंचीचे व्यासपीठ फुलांनी सजविण्यात येणार आहे. अतिशय देदीप्यमान आणि प्रचंड मोठा सेट या ठिकाणी उभारण्यात येईल, अशी माहिती कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी दिली. या कामासाठी जवळपास १५० लोक सध्या शिवाजी पार्कात झटत आहेत.
मोठ्या प्रमाणावर व्हीव्हीआयपी येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्तही असणार आहे. शिवाजी पार्क परिसरात एक हजार पोलिसांचा ताफा तैनात असणार आहे. अन्य यंत्रणांचे मिळून तब्बल दोन हजार इतके सुरक्षा दलाचे मनुष्यबळ या ठिकाणी कार्यरत असणार आहे. दोन एंट्री गेट तर एक व्हीआयपी गेट आणि एक एक्झिट अशी रचना मैदानात करण्यात आली आहे.
सेनापती बापट मार्गावरील वाहतूक वळवण्यात येणार
सुरक्षेच्या दृष्टीने सेनापती बापट मार्गावरील वाहतूकही वळविण्यात येणार आहे. कोहिनूरनजीकच्या महापालिकेच्या वाहनतळाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातून १ हजार वाहने उद्याच्या सभेसाठी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी करण्यात येतेय विशेष व्यवस्था
शिवसैनिकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विशेष निमंत्रितांसोबतच राज्यातील विविध भागांतून येणाºया शेतकरी कुटुंबांसाठी शिवाजी पार्कात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. ७०० शेतकरी कुटुंबेही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी दिली. सर्वांना सोहळा व्यवस्थित दिसावा यासाठी वीस एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.