हायलाइट्स:
- पूरग्रस्तांना शिवसेना आमदारांचा मदतीचा हात.
- सर्व आमदार आपले एक महिन्याचे वेतन देणार.
- उद्धव ठाकरेंचा आदेश येताच घेतला निर्णय.
वाचा: फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?’
महाराष्टातील विविध भागांत नुकत्याच आलेल्या पुरातील आपत्तीग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा: किरीट सोमय्यांविरोधात प्रताप सरनाईक कोर्टात, १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल
दरम्यान, शिवसेना पक्ष सत्तेत असला आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सरकारकडून होणाऱ्या मदतीव्यतिरिक्त पक्षपातळीवर मदतकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यासाठी झटत आहेत. आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर असून तिथेही त्यांनी हीच माहिती दिली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून योग्य अशी मदत पूरग्रस्तांना मिळणारच आहे पण दुसरीकडे शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्याचा आढावा घेण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे आदित्य यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांकडूनही मदत
शिवसेनेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार व खासदार आपले एक महिन्याचे वेतन देतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे.
वाचा: ‘मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाही, तिथे दिल्लीत काय पोचणार?’