नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. मात्र संपूर्ण सत्तासंघर्षाच्या नाट्यात भाजपाची सगळ्यात मोठी कोंडी झाली. अजित पवारांनासोबत घेऊन भाजपाने सरकार स्थापन केलं मात्र अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर भाजपा सरकार कोसळलं. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास का ठेवला? असा प्रश्न भाजपा नेत्यांमध्ये चर्चेत आहे. भाजपाच्या रणनीती एकनाथ खडसेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
एकनाथ खडसेंनी सांगितले की, अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावण्यात आले अशातच पक्षाने त्यांची साथ घेऊ नये असं वाटत होतं. मात्र त्यांच्याविरोधात जे रद्दी भरून पुरावे जमा केले होते. ते भाव चांगला मिळत असल्याने रद्दिवाल्याला विकून टाकले असा टोला लगावला आहे. अजित पवारांवर विश्वास का ठेवला असा सवाल भाजपा नेत्यांना पडला आहे. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विधिमंडळ नेते होते म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण याबाबत फडणवीसांनी योग्य वेळी बोलेन असं सांगून सस्पेन्स बनविला आहे.
याबाबत बुधवारी एका चॅनेलशी बोलताना अमित शहा म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडलेले होते. त्यांना सरकार बनविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. राज्यपालांनीही सरकार बनविण्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्यास असमर्थता दाखविली त्या पत्रावरही अजित पवारांची स्वाक्षरी होती. आमच्याकडे पाठिंब्याचे जे पत्र आले त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. या दरम्यान अजित पवारांवरील कोणतेही प्रकरणं मागे घेण्यात आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं. आमच्या महायुतीला लोकांनी कौल दिला. जनादेश हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. अनेक प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली होती. आम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता हे स्पष्ट करतो असं अमित शहांनी सांगितले.