हायलाइट्स:
- लसीकरणात महाराष्ट्राने गाठला आणखी एक विक्रमी टप्पा.
- लसचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहचली एक कोटींवर.
- आतापर्यंत तीन कोटी १६ लाख नागरिकांना लसचा पहिला डोस.
वाचा: चांगली बातमी! मुंबईतील करोनासंसर्ग नियंत्रणात
कोविड वरील लसचे दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे करोनापासून संरक्षण करण्यात आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विशेष कौतुक केले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे.
वाचा: पूरग्रस्त भागाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहेत. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरू असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात आज सुमारे ४ हजार १०० लसीकरण केंद्र सुरू असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचं खास ट्वीट
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या विक्रमी कामगिरीची स्तुती केली आहे. नैसर्गिक आपत्ती कोसळली असतानाही महाराष्ट्राने लसीकरणात विक्रमी कामगिरी करत १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. या कामगिरीसाठी आमचे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि अन्य अधिकारी यांचे मी अभिनंदन करतो, अशा आशयाचे ट्वीट आदित्य यांनी केले आहे.
वाचा:पूरग्रस्तांना धमकावल्याच्या आरोपांवर भास्कर जाधव यांचं सडेतोड उत्तर