हायलाइट्स:
- महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण
- ५० लाख नागरिकांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले.
- महाराष्ट्र राज्य लसीकरणात देशात सर्वात आघाडीवर.
वाचा: मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी घट; ‘ही’ आहे ताजी आकडेवारी
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
वाचा: तुंबलेल्या पाण्यातून चालला असाल तर ‘हा’ धोका; BMCने जारी केल्या सूचना
करोना प्रतिबंधक लसीकरणाचा अडीच कोटींचा टप्पा पार केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण प्रक्रियेत कार्यरत असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे देशात कोविड लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सातत्याने लसीकरणात आघाडीवर राहिला आहे. सध्या राज्याला केंद्राकडून लसपुरवठा करण्यात येत असून अनेक अडथळे पार करत राज्याने लसीकरणाची गती कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई, पुणे या महानगरांत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने अनेकदा लसीकरणाला ब्रेक लागला. मात्र, त्यानंतरही यंत्रणा अव्याहतपणे काम करत आहेत. आता १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारीही केंद्राने घेतली असून येत्या २१ जूनपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार हे निश्चित आहे.
वाचा: महाराष्ट्रात करोना मृत्यूचे आकडे का लपवले?; विखे पाटलांना ‘ही’ शंका