हायलाइट्स:
- सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी आरुढ
- राज्यपाल जगदीप धनखड यांनी दिली शपथ
- ‘ममता दीदीं’ना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्या शुभेच्छा
राज्यातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान राजभवननात आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल धनखड यांनी ममतांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
शपथविधीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी ममता दीदी यांना शुभेच्छा’ असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीसाठी पार्थ चॅटर्जी, सुव्रत मुखर्जी यांसारखे तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित होते. शिवाय, तृणमूलच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजवणारे रणनीतीकार प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी हेदेखील शपथग्रहण सोहळ्यात उपस्थित राहिले.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रं पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर आपली प्राथमिकता कोविड परिस्थितीशी दोन हात करण्यालाच असेल, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
तृणमूलचा शानदार विजय
तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवत इतिहास कायम केलाय. राज्यात सलग तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी जनतेनं दिलीय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २९२ विधानसभा मतदारसंघांपैंकी तब्बल २१३ जागांवर तृणमूल काँग्रेसला विजय मिळालाय. बहुमताहून हा आकडा बराच मोठा आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ ७७ जागा गाठणं शक्य झालंय.