हायलाइट्स:
- ब्रेक द चेन अंतर्गत नव्या आदेशाने लोकलचीही कोंडी.
- सर्वांसाठी लोकलची दारे तूर्त खुली होणार नाहीत.
- सरकारच्या पुढील आदेशापर्यंत वाट पाहावी लागणार.
वाचा: राज्यात तिसरी लाट कशी रोखणार?; सरकारने केल्या ‘या’ ८ महत्त्वाच्या सूचना
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच नव्या संकटाचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना डेल्टा व्हेरिएंट तर ही लाट घेऊन येणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळेच कोणताही धोका पत्करायचा नाही, असे सरकारने ठरवले असून त्यातूनच कठोर पावले टाकायला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्राने याबाबत अॅलर्ट जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही तातडीने कोविड निर्बंधांचे निकष बदलले आहेत.
वाचा: मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या घटली; आकडेवारीतील बदल चिंता वाढवणारा
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत नव्या आदेशात अनलॉकसाठीचा स्तर १ आणि स्तर २ बाद करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात आता स्तर ३ किंवा त्यापुढच्या स्तरांसाठीचेच निर्बंध लावले जाणार आहेत. त्यामुळे जे जिल्हे किंवा महापालिका क्षेत्रे सध्या स्तर १ किंवा २ मध्ये आहेत त्यांना अनेक निर्बंध पुन्हा एकदा स्वीकारावे लागणार आहेत. कोविड पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर मुंबई काही दिवसांपूर्वीच स्तर एकमध्ये दाखल झालीय. तरीही मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या आणि लोकलमधील गर्दी या बाबी लक्षात घेत महापालिका प्रशासनाने स्तर ३ चे निर्बंधच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध एक-दोन आठवड्यांत कमी केले जातील आणि सोबतच सर्वांसाठी लोकलची दारेही खुली केली जातील, या आशेवर मुंबईकर तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी होते मात्र राज्य सरकारच्या ताज्या आदेशाने ही आशा सध्या तरी मावळल्यात जमा आहे. मुंबईकरांना आणखी काही काळ लोकलसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरीय लोकल मधून सध्या केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. अन्य प्रवाशांना लोकल प्रवासास मनाई करण्यात आलेली आहे.
वाचा: काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी?; दिल्लीतील बैठकीवर पवार बोलले