Home गुन्हा National :जनता म्हणतेय ‘लीना ओ लीना’, अवघड मर्डर केस सोडवणारी ‘ही’ आहे तरी कोण?

National :जनता म्हणतेय ‘लीना ओ लीना’, अवघड मर्डर केस सोडवणारी ‘ही’ आहे तरी कोण?

लीनाच्या हुशारीसाठी तिला बक्षीस म्हणून नवीन पट्टा, रश्शी आणि नवी कोरी गादी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर लीनाचं खूप कौतुक सुरू आहे. कोण आहे बरं ही लीना? तर लीना हे एका लॅब्रेडोर जातीच्या कुत्रीचं नाव आहे. जी पोलिसांच्या डॉग स्क्वॉडचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अडीच वर्षांच्या लीनाने एका ब्लाईंड मर्डर केस सोडविण्यासाठी गाजियाबाद पोलिसांची खूप मदत केली आहे.

यासाठी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. गाजियाबाद पोलिसांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. लीनाच्या हुशारीमुळे मोहसीन, आदिल आणि सलमान या तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिघांनी विवेक नावाच्या एका तरुणाची हत्या केली होती. मोटरसायकलला टक्कर दिल्याच्या छोट्या कारणामुळे या तिघांनी विवेकची हत्या केल्याचे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र लीनाच्या हुशारीमुळे या तीनही आरोपींना पकडण्यात आलं आहे. तिला बक्षीस म्हणून नवीन पट्टा, रश्शी आणि गादी देण्यात आली आहे.

https://twitter.com/ghaziabadpolice/status/1271056839275196417?s=20

11 जूनला गाजियाबाद पोलिसांनी हे ट्विट केलं आहे. यानंतर तिचं कौतुक केलं जात आहे. पोलीस विभागातील राहुल श्रीवास्तव यांनी अनोख्या पद्धतीने लीनाचं कौतुक केलं आहे. लीना ओ लीना दिल तुने छीना अशा गाण्याच्या ओळी त्यांनी ट्विट केल्या आहेत. तर काहींनी या कामगिरीसाठी लीनाला मेजवाणी मिळायला हवी, अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण- एसएसपी कलानिधी नैथानी यांनी सांगितल्यानुसार 31 मे रोजी मसूरी ठाणे क्षेत्रात वीज विभागातील एका कर्मचाऱ्याची संशयास्पद हत्या झाली होती. या प्रकरणात कुटुंबीयांनी तिघांविरोधात तपास सुरू केला होता. मात्र प्राथमिक तपासात तिघेही निर्दोश वाटत होते. अशात पोलिसांनी लीनाची मदत घेतली. तिने या प्रकरणाचा तपास करीत दहा दिवसांच्या आत तिने खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचवले. रिपोर्टनुसार लीनाची ट्रेनिंग आयटीबीपी केंद्र पंचकूला येथून झाली आहे. सध्या लीनाच्या हुशारीचं मोठं कौतुक केलं जात आहे.