हायलाइट्स:
- चौकशा थांबवायला आम्ही मोदी-शहांना भेटणार नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसचं ईडी, सीबीआयच्या कारवाईवर बोट.
- भाजप ही वॉशिंग मशीन; पक्षात डाकू पण साधू होऊ शकतो!
वाचा: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्ये येण्यासाठी कशाप्रकारे तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते, याचे दाखले देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चौकशीवरही मलिक यांनी बोट ठेवले. ‘ नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे हे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. राणे यांनी या भेटीबाबत इन्कार केल्यावरही भाजपच्या लोकांनी हा व्हिडिओ पसरवला. अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्येही अनेक नेत्यांना भाजपात आणले गेले. ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर करून अनेक नेत्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडले जात आहे किंवा तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे’, असा आरोपच मलिक यांनी केला. भाजपमध्ये संबंधित नेते गेल्यावर तपास यंत्रणांकडून सुरू असलेली त्यांची चौकशी अचानक बंद होते. याचे अनेक दाखले देता येतील, असेही मलिक पुढे म्हणाले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे विधान खुद्द नितीन गडकरी यांनी केले होते, त्याची आठवणही यावेळी मलिक यांनी करून दिली.
वाचा: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फडणवीसही दिल्लीत
आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती मात्र, ती परत घेण्यात आली. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केली. त्यामुळे आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटिशीला आणि कारवाईला घाबरणार नाही, असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला. आमचे नेते ज्या तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावाही मलिक यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय म्हणून या चौकशा थांबवा, हे सांगण्यासाठी आमचा कोणताही नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी वा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीच्या अनुषंगाने त्यांचे हे विधान होते.
वाचा: ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते?; ‘या’ काँग्रेस नेत्याने केले मोठे विधान