हायलाइट्स:
- अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी.
- भाजप म्हणेल तेच होणार, ही लोकशाही आहे का?
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल.
वाचा:विधानसभाध्यक्षपद: ‘मविआ’च्या संख्याबळावर राष्ट्रवादीचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला होता. त्यानंतर आता हीच मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज एका पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने नवाब मलिक यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ‘भाजप ठरवणार. भाजप मागणी करणार. भाजपची लोकं निर्णय घेणार. भाजप लोकांना अटक करणार. लोकांना दंडही भाजप ठोठावणार. ही लोकशाही आहे का?’, असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
वाचा: अजित पवारांच्या अडचणी वाढवणार?, CBI चौकशीसाठी थेट अमित शहांना पत्र
आम्ही बोलू तोच कायदा. आम्ही बोलू तेच होणार, इतकी लोकशाहीची थट्टा कधीही होऊ शकत नाही, असे सांगताना पश्चिम बंगालचा दाखला देत मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने देशात भयाचे वातावरण तयार केले आहे. लोकांवर राजकीय दबाव आणला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हेच करण्यात आले. मात्र हे बंगाल मॉडेल फेल ठरलं हे भाजपने लक्षात ठेवावे, असे मलिक यांनी सुनावले. भाजपला महाराष्ट्रात बंगाल मॉडेल करायची इच्छा असेल तर ते त्यांनी जरूर करावे. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असे आव्हानही मलिक यांनी दिले.
वाचा: फडणवीसांच्या तीन मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र