NZ vs IND : भारताने न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळत मिळवली आघाडी

- Advertisement -

हॅमिल्टन : भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी भेदक मारा करत न्यूझीलंडच्या संघाला २३५ धावांत गुंडाळले. त्यामुळे आता भारताकडे दुसऱ्या दिवसअखेर ८७ धावांची आघाडी आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला होता. त्यावेळी भारतीय संघ या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेणार का, याबाबत संभ्रम होता. पण भारताच्या गोलंदाजांनी आज भेदक मारा करत न्यूझीलंडला २३५ धावांत माघारी धाडले.

भारताच्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक तीन बळी मिळवले वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने. या सामन्यात शमीने भेदक मारा करत फक्त १७ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. न्यूझीलंडच्या संघाकडून हेनरी कुपरने सर्वाधिक ४० धावा केल्या.

भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला सर्व बाद केल्यावर भारताचे सलामीवीर फलंदाजीला आले. पहिल्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉला भोपळाही फोडता आला नव्हता, तर दुसरीकडे मयांक अगरवालला फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले होते. पण या डावात दोघांनीही आश्वासक सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसअखेरीस पृथ्वी नाबाद ३५ आणि मयांक नाबाद २३ धावांवर खेळत होते.

- Advertisement -