Home गुन्हा Pimpri : चिमुकलीच्या अंगावर विस्तवाचे चटके; नराधमाला अटक करण्याची मागणी

Pimpri : चिमुकलीच्या अंगावर विस्तवाचे चटके; नराधमाला अटक करण्याची मागणी

 तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर अज्ञाताने विस्तवाचे चटके दिले. ही घटना रविवारी (दि. 30 जून) रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास विद्यानगर चिंचवड येथे घडली. चिमुकलीच्या आईने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तक्रार देऊन चार दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी सापडला नाही.

दिव्या जोशी (वय 3) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. कल्पना दामोदर जोशी (वय 24) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

  • दामोदर जोशी मजुरीचे काम करतात. त्यांचे कुटुंब विद्यानगर चिंचवड येथील मोरे चाळ येथे वास्तव्यास आहे. रविवारी दामोदर कामासाठी गेले. त्यानंतर कल्पना आणि त्यांची लहान मुलगी दिव्या दोघीच घरी होत्या. दुपारी सव्वातीनच्या सुमारास कल्पना काही कामानिमित्त घराजवळ गेल्या. तेंव्हा मुलगी दिव्या घरी एकटीच होती. घराजवळ खेळत असताना अज्ञाताने दिव्याच्या अंगावर चटके दिले. यामध्ये दिव्याला गंभीर इजा झाली. कल्पना थोड्या वेळाने घरी आल्या असता हा प्रकार समोर आला. त्यांनी दिव्यावर उपचार केले. तसेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

घटनेला चार दिवस लोटले आहेत. पिंपरी पोलिसांना अजूनही आरोपी सापडलेला नाही. आरोपी मोकाट राहिल्यास असा प्रकार पुढे इतर मुलांच्या बाबतीतही होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारचे कृत्य करणा-या नराधमाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी केली आहे.