पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 15 उपक्रमशील शाळांच्या माध्यमातून नवीन शाळा दत्तक घेऊन शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांची पटसंख्या, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, डी.बी.टी. योजना अशा विविध पातळ्यांवर काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे धडे दिले जाणार आहेत.
महापालिकेच्या यापूर्वी 12 उपक्रमशील शाळा होत्या. त्यामध्ये आता नव्याने 3 शाळांची भर पडली आहे. महापालिका शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी उपक्रमशील शाळांनीच महापालिकेच्या अन्य शाळांना दत्तक घेऊन गुणवत्ता वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. उपक्रमशील शाळांमध्ये सध्या पहिल्या आणि तिस-या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे.
यू ट्युबच्या माध्यमातून विविध प्रयोगांची माहिती घेऊन विद्यार्थी त्याचा प्रत्यक्ष प्रयोगामध्ये वापर करीत आहे. विविध व्याख्यात्यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी बचतीचा संदेश दिला जातो. उपक्रमशील अध्ययन करताना भविष्यातील गंभीर समस्या म्हणून पाणी टंचाई हा प्रश्न हाताळण्यात येणार आहे . यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
प्राथमिक शिक्षण विभाग पर्यवेक्षिका अनिता जोशी व सुजाता खणसे म्हणाल्या, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपक्रमशील शाळांच्या माध्यमातून अन्य शाळांमध्ये देखील विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शाळा दत्तक योजना राबविली जाणार आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्ता वाढ, शोधक वृत्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यामुळे सर्व शाळांचा असा उपक्रमांमध्ये टप्प्याटप्याने समावेश वाढेल’