Home अश्रेणीबद्ध Pune : काळ आला होता पण..!

Pune : काळ आला होता पण..!

कितीही मोठी दुर्घटना घडली, भयंकर संकट कोसळले तरीही जोपर्यंत मृत्यू तुम्हाला गाठत नाही तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. कोंढवा येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या घटनेत कोणतीही इजा न होता आश्चर्यकारकरित्या विमल शर्मा हा बांधकाम मजूर बचावला.

कोंढवा भागात चालू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामासाठी हा बिहारमधून आलेला आहे. त्याच्या समवेत १८ जण या कामावर आलेले होते. या ठिकाणी इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरु आहे. या जागेच्या शेजारीच आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाउंडची भिंत आहे. या भिंतीशेजारीच खोलगट भागात बांधकाम मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्या आहेत.

शुक्रवारी दुपारपासून शहरात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. रात्री काम संपल्यानंतर सर्व मजूर झोपी गेलेले असतानाच मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास जमीन खचल्यामुळे आल्कन स्टायलस सोसायटी संरक्षक भिंत या झोपड्यांवर कोसळली. त्यावेळी पाऊस कोसळत होता. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बरेच जण झोपेमध्ये असतानाच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. विमल शर्मा याच्या पायावर मातीचा ढिगारा कोसळला. त्याने मदतीसाठी हाका मारल्या. त्याच्याच गावाच्या व्यक्तीने त्याला बाहेर काढल्यामुळे तो सुखरुपणे बचावला. मात्र या घटनेमध्ये त्याचा सख्खा भाऊ दगावला.

विमल शर्मा याचा काळ आला होता पण अजून वेळ आलेली नसल्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. पण त्याचे दुर्दैव असे की त्याच्या सख्ख्या भावासहित 15 जणांचा मृत्यू जवळून पाहण्याची वेळ त्याच्यावर आली.