‘हिंगणघाट’च्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच मृत झालेल्या युवतीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, स्वरदा बापट, शहराचे सरचिटणीस गणेश घोष, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शशीकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जगदीश मुळीक म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारच्या हाताबाहेर गेला आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ही बाब या घटनेमुळे स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची प्रचंड लाट आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत.’
पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी कठोर शिक्षा मारेकर्याला घडवावी, असे मत उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले.
ही अत्यंत दुःखद, धक्कादायक आणि मन सून्न करणारी घटना आहे. राज्य शासनाने विश्वासार्हता गमावली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा करावी, असे आवाहन सभागृहनेते धीरज घाटे यांनी केले.
गेल्या चार महिन्यांत राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. कायदा आणि सुविधा परिस्थितीवर शासनाचे नियंत्रण नाही. दोषींना जरब बसेल अशी शिक्षा करावी. अन्यथा, भाजपला वारंवार या विषयात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिला.






















WhatsApp