हायलाइट्स:
- राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसैनिकांशी साधला संवाद.
- मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाबाबत प्रश्नावर सूचक उत्तर.
- शुभेच्छा दिल्या, तू काळजी करू नको म्हणत अधिक बोलणं टाळलं.
वाचा: उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील, राऊतांच्या विधानावर पवार म्हणाले…
राज ठाकरे यांनी पक्षसंघटन भक्कम करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवत त्यांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. नाशिक, पुणे, ठाणे या शहरांवर पहिल्या टप्प्यात त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिक आणि पुणे येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज यांनी आज ठाण्यातील मनसैनिकांशी संवाद साधला. त्याआधी ते माध्यमांशी बोलले. यावेळी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाबाबत विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. तुम्ही काय सांगाल, असे एका पत्रकाराने विचारले असता ‘मुख्यमंत्र्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची तू काळजी करू नको’ असे उत्तर राज यांनी दिले.
वाचा: उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील, संजय राऊतांच्या विधानावर पवार म्हणाले…
दरम्यान, राज्यावर कोसळलेलं महापुराचं संकट आणि अजूनही कायम असलेला करोनाचा धोका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आधीच जाहीर केलेला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा अधिकृत कोणताही कार्यक्रम नसला तरी मुख्यमंत्र्यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचं ट्वीटही यात चर्चेत आहे. ‘अखंड साथ. अतुट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!’, असे ट्वीट करत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्याची भरभरून स्तुती केली आहे. शुभेच्छांच्या या वर्षावात राज यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात की नाहीत याची उत्सुकता माध्यमांना होती. राज यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर असं ट्वीटही दिसलं नाही. त्यामुळेच माध्यमांनी त्यांना याबाबत विचारणा केली मग त्यावर राज यांचंही समर्पक उत्तर आलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात हेही स्पष्ट झालं.
वाचा: राज्यपालांचे पुस्तक पुरात वाहून गेले की काय!; संजय राऊत यांचा हल्लाबोल