Home अश्रेणीबद्ध Talegaon Dabhade : पूर्ण पैसे दिल्यानंतरही अतिरिक्त पैशांसाठी ‘बिल्डर’चा तगादा

Talegaon Dabhade : पूर्ण पैसे दिल्यानंतरही अतिरिक्त पैशांसाठी ‘बिल्डर’चा तगादा

एका बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला कराराप्रमाणे ठरलेले पैसे अदा केल्यानंतर लेखी पत्र देऊन सदनिकेचा ताबा दिला असताना आता साडेतीन वर्षानंतर अतिरिक्त पैशांची मागणी केली. पैशाकरिता वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. खरेदीखत करुन देण्याची विचारणा केल्यानंतर दमबाजी केल्याचा आरोप सदनिकाधारक संगीता शेडे यांनी केला आहे. बांधकाम व्यावसायिक संकेत जोशी यांनी फसवणूक केली असून त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील गृहप्रकल्पाची चौकशी करावी. 15 दिवसाच्या आतमध्ये न्याय मिळावा. अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेडे यांनी दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, तळेगाव नगरपरिषदेचे मुध्याधिकारी वैभव आवारे यांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रात शेडे यांनी म्हटले आहे की, बांधकाम व्यावसायिक संकेत जोशी यांनी विकसित केलेल्या न्यू आनंदनगर तळेगावदाभाडे येथील ‘गणेश रेसिडन्सी’ या गृहप्रकल्पात आम्ही 5 मे 2014 मध्ये सदनिका खरेदी केली. कराराप्रमाणे सदनिकेची पूर्ण रक्कम दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक जोशी यांनी 18 डिसेंबर 2015 मध्ये घराची संपूर्ण रक्कम दिले असल्याचे लेखी पत्र देऊन आम्हाला सदनिकेचा ताबा दिला.

तीन वर्ष उलटून गेले तरी बांधकाम व्यावसायिक जोशी यांच्याकडून खरेदीखत करुन दिले जात नाही. आता बांधकाम व्यावसायिक जोशी, त्यांच्यासोबत काम करणारे अमित नगरकर यांनी 28 मार्च 2019 रोजी आम्हाला नोटीस दिली आहे. दोन लाख 80 हजार रुपये तुमच्याकडून येणे असून ते देण्याची मागणी केली. अन्यथा तुमचे घर तुमच्या नावावर होणार नाही अशी धमकी दिली. तसेच जबरदस्तीने पत्रावर सही करुन घेतली. खरेदीखत करुन देण्याबाबत विचारणा केल्यास दमबाजी केली जाते, असा आरोप शेडे यांनी केला आहे.

बांधकाम व्यावसायिकाने इमारतीची पूर्ण जागा व आजुबाजूची सामायिक जागा विकलेली आहे. वाहनतळ देखील दिले नाही. पाण्याच्या टाकीवर वाहने पार्क करण्यासाठी जागा कशी दिली ? आर्किटेक्टच्या प्लॅननुसार एकाच वाहनतळाचा उल्लेख असताना पाच वाहनतळे केली असल्याचा आरोप संगीता शेडे यांनी केला. बांधकाम व्यावसायिक जोशी यांनी तळेगाव दाभाडे येथे बांधलेल्या गृहप्रकल्पाची सखोल चौकशी करावी. रेराने जोशी यांची नोंद रद्द करावी. मला 15 दिवसांच्या आत न्याय मिळावा. अन्यथा मुंबईत मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संगीता शेडे यांनी निवेदनातून दिला आहे.

दरम्यान, याबाबत बांधकाम व्यावसायिक संकेत जोशी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध मोबाईल नंबरवर संपर्क साधला. पण, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.