हायलाइट्स:
- हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांचे भाजपला खडेबोल.
- हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आमच्या हृदयात.
- महाविकास आघाडी किती काळ टिकणार हे आम्ही पाहू.
वाचा:मी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर…; CM ठाकरेंची टोलेबाजी
‘हिंदुत्वाबद्दल बोलताना अनेकांचा गैरसमज होत आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व कसे असू शकेल. ही काही कुणाची कंपनी नाही. याचे पेटंट तुम्हाला दिलेले नाही’, अशा शब्दांत भाजपवर तोफ डागत उद्धव ठाकरे यांनी शिवेसेनेसाठी हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय हे उलगडवून सांगितले. ‘माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही हे माझे नाही तर बाळासाहेबांचे सांगणे होते. हिंदुत्व म्हणजेच आमच्यासाठी राष्ट्रीयत्व आहे. त्यात सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता, हा दंडक शिवसेनेने पाळला आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा, भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. म्हणून तर आम्ही एकमेकांना भेटल्यावर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ बोलतो. आमच्यासाठी देश आधी आणि मग महाराष्ट्र आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वाचा: शिवसेनेचे भवितव्य काय?; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान
शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तरी शिवसेना कधीच थांबली नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तो बुलंद केला. मुंबई या आपल्या शहरात मराठी माणूस क्षुल्लक बनला होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करण्याचे काम शिवसेनेने केले, असे सांगत विरोधकांना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार किती काळ टिकणार, ही आघाडी कधीपर्यंत राहणार, असा प्रश्न काहींना पडला आहे पण त्याची चिंता कुणी करण्याचे कारण नाही. ते पाहायला आम्ही समर्थ आहोत. सध्या तरी आमच्यासाठी महाराष्ट्रातील गोरगरिबांचे हित महत्त्वाचे आहे. समान किमान कार्यक्रम घेऊन आम्ही काम करत आहोत. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचले.
वाचा:‘या’ स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे