55 वर्षांपासून इंग्लंडने कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही. त्यामुळे घरच्या मैदानावर सामना जिंकण्याचं मोठं दडपण इंग्लंड टीमवर होतं, पण इटलीने त्यांची ही प्रतीक्षा कायम ठेवली. त्यामुळे नाराज झालेल्या इंग्लिश चाहत्यांनी स्टेडियमबाहेर इटालियन चाहत्यांवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. इंग्लिश चाहत्यांनी इटालियन चाहत्यांची धरपकड करत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारलं.
वेम्बले स्टेडियमबाहेर झालेला राडा एवढ्यावर थांबला नाही. इंग्लिश चाहत्यांनी या पुढे जात इटालियन चाहत्यांवर वर्णद्वेषी टिप्पणीही केली तसेच इटलीच्या राष्ट्रध्वजाचा अपमानही केला. काही इंग्लिश चाहते इटलीच्या राष्ट्रध्वजावर थुंकताना दिसले, तर काहींनी इटलीचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवला. याचे व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियात व्हायरल झाले. पराभवानंतर इंग्लंडवर जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
वाचा- euro 2020 final : पेनेल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा थरारक विजय, युरो चषक पटकावला
1966 नंतर प्रथमच इंग्लंड अंतिम फेरीत
1966 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे मोठ्या संख्येत इंग्लिश फुटबॉलप्रेमी वेम्बले स्टेडियमबाहेर जमा झाले होते. मॅच जिंकल्यानंतर मोठा जल्लोष करण्याच्या तयारीने सर्वजण आले होते. पण इंग्लंडच्या पदरी निराशा पडली.
आक्रमक झालेल्या इंग्लिश चाहत्यांनी रस्त्यावर राडा केला. अस्वच्छता पसरवली तसेच काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या. यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांवर जगभरातून टीका होत आहे.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडने गोल करत आघाडी घेतली आणि सामना जिंकण्याचे त्यांचे इरादे दर्शवले. 1 मिनिट आणि 57 व्या सेकंदाला झालेला हा गोल युरोच्या इतिहासातील सर्वात जलद झालेला गोल ठरला आहे. पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेल्या इंग्लंडने ती आघाडी कायम राखली नाही. दुसऱ्या हाफमध्ये इटलीच्या लिओनार्डो बोनसीने 67 व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्येही सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउटमध्ये सामना गेला. यावेळी इटलीने इंग्लंडला 3-2ने नमवत जेतेपद पटकावले. इटलीचा गोली जियानलुगी डोन्नरम्मा सामन्याचा हिरो ठरला.