हायलाइट्स:
- नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर
- एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर होणार सुटका
- जामीन देताना हायकोर्टानं घातल्या अनेक अटी
दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर आहे. दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. तसंच, दाभोलकरांच्या खुनासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यातही त्यानं मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी मागील वर्षी मे महिन्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.
वाचा: यांना काहीच झेपत नाही; भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढं भावेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयानं अनेक अटी घातल्या आहेत. त्यानुसार, भावेचा पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्यात येणार आहे. आरोपीने पुण्यातील विशेष न्यायालयाच्या हद्दीतच रहावे आणि स्थानिक न्यायालयात पहिल्या एक महिन्यात दररोज, पुढच्या दोन महिन्यांत आठवड्यातून दोन दिवस आणि त्यानंतर खटला संपेपर्यंत आठवड्यातून एकदा हजेरी लावावी. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, पीडितांच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये. शिवाय अशाच प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यात यापुढे सहभागी होऊ नये, अशी अटी घालण्यात आल्या आहेत. यापैकी एकाही अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होईल, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.
कोण आहे विक्रम भावे?
विक्रम भावे हा हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये ४ जून २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रमला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती. मधल्या काळात त्याची जामिनावर सुटका झाली होती.
वाचा: ‘…म्हणून आदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा मिळायला हवी’