हायलाइट्स:
- दडी मारलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार
- Weather Alert : राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. इतकंच नाहीतर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शनिवारी, तर अमरावती, अकोल्यामध्ये रविवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
९ जुलैनंतर कोकणात जोर वाढणार
पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.