हायलाइट्स:
- राज्यात ‘या’ तारखेपर्यंत हवामान खात्याकडून अलर्ट
- राज्यात अतिवृष्टीचा इशारा
- ‘या’ वेळेत वीज कोसळण्याचा धोका
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवार दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी वीज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
दरम्यान, साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत वीज पडण्याचा धोका असल्या कारणाने पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक शेतीची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.