हायलाइट्स:
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ निकाल
- ममता बॅनर्जी विजयी, तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागांवर आघाडी
- ममता बॅनर्जी आणि पक्षावर अभिनंदनाचा वर्षाव
- मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांनी केले अभिनंदन
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंतचे कल बघता तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी देखील नंदीग्राममधून विजयी झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी त्यानंतर ट्वीट करून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन. पश्चिम बंगालच्या लोकांनी फूट पाडणाऱ्या आणि विभाजनवादी पक्षांना नाकारले. त्यासाठी येथील लोक कौतुकास पात्र आहेत,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनीही केले अभिनंदन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. जबरदस्त विजयासाठी ममताजींचे अभिनंदन. काय जबरदस्त सामना! पश्चिम बंगालच्या लोकांचेही अभिनंदन!, असे केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तेजस्वी यादव काय म्हणाले ?
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. पश्चिम बंगालच्या ममतामयी जनतेचे कोटी कोटी अभिनंदन. आज संपर्ण देश कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालने पुन्हा एकदा आपली ममता आणि विश्वास आपल्या दीदींवर दाखवला आहे. हा जनतेचा स्नेह आणि विश्वासाचा विजय आहे. ममता बॅनर्जी यांच्या दृढ आणि कुशल नेतृत्वाचा हा विजय आहे, असे तेजस्वी म्हणाले.