हायलाइट्स:
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ मतमोजणी
- उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कर्मचारी बेशुद्ध पडला
- केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात केले दाखल
बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्याला मतमोजणी केंद्रावरून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात प्रथमोपचार केले जात आहेत, अशी माहिती समजते. कर्मचाऱ्याला स्ट्रेचरवरून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी मतमोजणी केंद्रातील टेबलावर बेशुद्ध पडला. तो जमिनीवर कोसळला. त्याला केंद्रावरील काही जणांनी तात्काळ स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
बंगाल विधानसभेच्या २९२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली असून, मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचे कल बघता भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. दोन्ही पक्षांनी बहुमताचा दावा केला असला तरी, काही वेळात चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून, बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिथे ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस सुरू आहे. सुरुवातीला सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र, आता ममता बॅनर्जी या आघाडीवर असल्याचे कळते.