हायलाइट्स:
- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मारणार विजयी हॅट्ट्रिक
- विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा ठरणार
- राहुल गांधी यांचे टेन्शन वाढणार का? राजकीय वर्तुळात चर्चा
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोणती रणनीती आखणार?
ममता बॅनर्जी विरोधी पक्षांचा चेहरा ठरणार
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस यांनी मिळून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी विरोधी पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकाच व्यासपीठावर भाजपसममोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी सर्व विरोधी पक्षांचे नेते विखुरले गेले. त्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांचे नेतृत्व आणि सर्वांच्या सहमतीच्या चेहऱ्याची उणीव भासू लागली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली तर, त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा ठरतील, असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
ममतांच्या तोडीचा विरोधकांमध्ये एकही नेता नाही
विरोधी पक्षांमधील नेतृत्वाचा विचार केला तर, पहिले नाव हे राहुल गांधींचे येते. लागोपाठ दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अद्याप कोणत्याही विधानसभा निवडणुकीत प्रचंड फरकाने विजय मिळवलेला नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केवळ छत्तीसगड निवडणूक जिंकली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटकात काही महिन्यांनी भाजप सत्तेत आला आहे. राजस्थानमध्येही अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद कायम आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातही आपल्या आमदारांमध्ये एकजूट टिकून ठेवण्यात ते सक्षम नाहीत, असा संदेश यातून जात आहे.
राहुल यांच्याशिवाय इतर चेहऱ्यांचा विचार केला तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेते आहेत. पण भाजपसमोर आपली ताकद दाखवता आलेली नाही. ममता बॅनर्जी यांनीच भाजपला थेट आव्हान देतानाच, त्यांना पराभूत करण्याचा करिश्मा दाखवून दिला आहे.
सोनिया गांधींचे पुढचे पाऊल काय असणार?
राहुल गांधी हे विरोधी पक्षांचा चेहरा ठरू शकतील यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सातत्याने प्रयत्नशील आहेत, असे मानले जात आहे. मात्र, ममता यांच्या या विजयानंतर तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यांतही विधानसभा निवडणूक झाली आहे. या राज्यांतील सुरुवातीचे कल बघता, आसाम, पद्दुचेरी आणि केरळमध्ये काँग्रेस पराभवाच्या छायेत आहे. तामिळनाडूत डीएमकेच्या ताकदीने विजयाच्या जवळ पोहोचला आहे. अशा वेळी सोनिया गांधी या राहुल यांना विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून कसे पुढे आणू शकतील. त्यासाठी ते कोणती रणनीती आखतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.