West Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव

West Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव
- Advertisement -


हायलाइट्स:

  • बंगालमध्ये ममता बॅनर्जींची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
  • मोदी-शहांचा अंदाज नेमका कुठे चुकला?
  • बंगाल विजयाचं भाजपचं स्वप्न पुन्हा अपूर्ण

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Election 2021 Result) ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेसने २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं भाजपचं स्वप्न उद्धवस्त होताना दिसत आहे.

बंगालची विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे देशभरातील दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदींनी करोना काळातही अनेक सभा घेत भाजपच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसंच आम्ही २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शहा यांच्याकडून केला जात होता. मात्र बंगालच्या मतदारांवर अजूनही ममतादीदींचीच जादू कायम असल्याचं आजच्या निकालानंतर स्पष्ट झालं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर आपण ममता बॅनर्जींना धूळ चारू, असा आत्मविश्वास भाजप होता. त्यासोबतच भाजपने आपली पूर्ण ताकद ही निवडणूक जिंकण्यासाठी झोकून दिली होती. असं असतानाही भाजपला दारूण पराभव का स्वीकारावा लागला, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरूंग, का झाला भाजपचा पराभव?

LIVE Assembly Elections 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत
LIVE : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक २०२१ निकाल
१. बंगाली अस्मिता

ममता बॅनर्जी या मुस्लिमांचं तुष्टीकरण करत असून त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला आहे, असा आरोप करत भाजपने तृणमूल काँग्रेसला घेरलं. मात्र ‘बंगाल की बेटी’ म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या अजेंड्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. हे बाहेरचे लोक बंगालला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जींच्या या आरोपाला उत्तर देईल असा मजबूत प्रादेशिक नेता भाजपकडे नव्हता. परिणामी बंगाली अस्मितेचा मुद्दा वरचढ ठरला आणि त्याचा ममतादीदींना फायदा झाल्याचं निवडणूक निकालातून दिसत आहे.

२.अपेक्षित प्रमाणात हिंदू मतांचं धृवीकरण झालं नाही!

भाजपने लोकसभा निवडणुकीपासूनच बंगालमध्ये धृवीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. बंगालमध्ये भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आणखी आक्रमकपणे मांडला. भाजपच्या प्रमुख नेत्यांपासून सामान्य कार्यकर्तेही ‘जय श्री राम’ ही घोषणा प्रचाराच्या मैदानात देताना दिसले. तसंच ममता बॅनर्जी या हिंदूविरोधी असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. मुस्लिम मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार नाही, याची संपूर्ण जाणीव पक्षाला होती. त्यामुळे हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्यावर भाजपने भर दिला. मात्र भाजपची ही खेळी ममता बॅनर्जी यांनी उधळून लावली.

मी देखील ब्राह्मणाची मुलगी आहे, असं सांगत ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेतच संस्कृत श्लोक बोलून दाखवले. याद्वारे भाजपने तयार केलेली हिंदूविरोधी ही प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न ममतादीदींकडून करण्यात आला. भाजपला १००पेक्षा कमी जागांवर रोखण्यात तृणमूलला मिळालेलं यश हेच दाखवून देत आहे की हिंदू मतांचं पूर्ण धृवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे.

West Bengal Poll: ‘दीदी ओ दीदी’ नाही ‘जिओ दीदी’; अखिलेश यांचा मोदींना टोला
West Bengal Poll: पश्चिम बंगालच्या विजयासाठी शरद पवारांकडून ममता ‘दीदी’चं अभिनंदन!

३.मुस्लिम मतदार ठामपणे ममतांच्या पाठिशी

बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम मतदार ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभे असल्याचं पाहायला मिळतं. बिहारसारख्या राज्यात एमआयएमच्या असदुद्दीने ओवैसी यांनी मिळवलेल्या निर्णायक यशामुळे बंगालमध्येही मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळे मुस्लिम मतदारांनी भाजपला रोखू शकणाऱ्या सर्वात मोठ्या पक्षामागेच म्हणजेच तृणमूल काँग्रेसमागेच आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

४. महिलांची मते ठरली निर्णायक

पश्चिम बंगालमधील महिला मतदार हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीतही महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. त्यामुळे बंगाली महिला कोणाच्या बाजूने आपला कल देणार याची उत्सुकता होती. आतापर्यंत आलेल्या कलानुसार तरी या महिलांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोठा वाटा उचलल्याचं पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात महिलांना थेट मदत करणाऱ्या काही योजनांमुळे त्यांना महिलावर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी प्रक्रिया अद्याप संपली नसली तरीही अनेक फेऱ्यांमधील मतमोजणीनंतरही तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे बंगाल जिंकण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा हवेत विरल्याचं पाहायला मिळत आहे.

west bengal election result 2021: ममता बॅनर्जींच्या विजयानं राहुल गांधींचं टेन्शन वाढणार का?
Kerala Poll: पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा पसंती, बहुमत LDF च्या पारड्यात



Source link

- Advertisement -