Home शहरे जळगाव अज्ञात चोरट्याने माणगांवातील विंचवली व होडगांव कोंड या ठिकाणची एकाच रात्री दोन घरे फोडून रोख रक्कमेसह किंमती ऐवज केला लंपास

अज्ञात चोरट्याने माणगांवातील विंचवली व होडगांव कोंड या ठिकाणची एकाच रात्री दोन घरे फोडून रोख रक्कमेसह किंमती ऐवज केला लंपास

0

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचे सत्र काही केल्या संपता संपेना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात गुलाबी थंडी आणि घरफोड्या याचे जणू समीकरणच होत चालले आहे. रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते २० जानेवारी रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान फिर्यादी बिपीन किशन सुर्वे रा. विंचवली तालुका माणगांव यांच्या विंचवली येथील राहत्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराच्या लगतच्या भिंतीस होल पाडून त्यावटे आत हात घालून आतील कडी काढून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून फिर्यादी यांचा रोख रक्कम ११,०००/- रुपये ५०० च्या २० नोटा, २०० च्या २ नोटा, १०० च्या ६ नोटा तसेच १,२०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र त्यास दोन पदरी मध्यभागी चैन तसेच पेंडल, १,८०,०००/- रु. किमतीचे २ सोन्याचे हार सदर हारांचे वजन तीन तोळे व दुसऱ्या हाराचे वजन एक तोळा तसेच २०,०००/- रु. किमतीची कानातील अर्ध्या तोळाची कुडी जोड व ४०००/- रु. किमतीची सोन्याची नथ, २०००/- रु. किमतीची सोन्याची नाकातील फुली आणि ४०,०००/- रु. किमतीचे सोन्याची चैन त्यास एक पेंडल तसेच १,२८,०००/- रु. किमतीच्या सोन्याच्या एकूण ८ अंगठ्या एकूण ३२ ग्राम वजनाच्या सोन्याच्या वस्तू असा एकूण ५,२४, २५०/- रु. किमतीचा माल घरफोडी करून अज्ञात चोरट्याने मोठ्या शिताफीने लंपास केला.
सदर घटनेची नोंद फिर्यादी ने माणगांव पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. १४/२०२० भा. द. वि. क. ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. कावळे हे करीत आहेत.
तसेच होडगाव कोंड येथे दि. १९ जानेवारी ते २० जानेवारीच्या दरम्यान फिर्यादी बळीराम शिवराम नांदे वय ५६ व्यवसाय शेती यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून दारावाटे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यानी रोख रक्कम ४०,०००/- रु. भारतीय चलनाचे २०००/- च्या १६ नोटा, ५००/- रु. च्या १२ नोटा, २००/- रु. च्या ८ नोटा, १००/- रु. च्या ४ नोटा फिर्यादी यांचा मुलगा शैलेश बळीराम नांदे यांच्या नावाचे ओळखपत्र, आधार कार्ड, चारचाकी वाहनाचा चालक परवाना, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटी एम कार्ड ई. कागदपत्रे घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला.
सदर घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३/२०२० भा. द. वि. क. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस हवालदार श्री. म्हात्रे करीत आहेत. त्यामुळे सदर चोरीच्या घटनेतील चोरट्यांच्या मुसक्या माणगांव पोलीस कीती जलद गतीने आवळतात या कडे माणगांव मधील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
सदर चोरीच्या घटनेमुळे माणगांव तालुक्यातील जनतेत भय सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे.