अमरावती नदी पुन्हा प्रवाही होईपर्यंत प्रयत्न थांबणार नाही – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    - Advertisement -

    • नदी आटण्याची कारणे शोधून भूजल पुनर्भरण, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यावर भर

     धुळे, दि. २१  : दोंडाईचा शहराची जीवनवाहिनी असलेली अमरावती नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांसह तज्ज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक उपाययोजना करण्यात येतील. नदीचे पुनरुज्जीवन करताना पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे, नैसर्गिक जलप्रवाह मोकळे करणे आणि वृक्षारोपणाला प्राधान्य देण्यात येईल. अमरावती नदीत पुन्हा पाणी येईपर्यंत आपले प्रयत्न थांबणार नाहीत, असा निर्धार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येथे व्यक्त केला.

    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे अमरावती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तज्ज्ञ पथक पाठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (NRCD) यांच्या संयुक्त पथकाने दोंडाईचा येथे भेट देऊन नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. नदी आटण्यामागील कारणांचा शोध घेणे, तिच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळे ओळखणे आणि पुनरुज्जीवनासाठी योग्य उपाययोजना सुचविणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

    यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे संचालक तथा सहसचिव मिलिंद पानपाटील, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे शास्त्रज्ञ ‘डी’ उपेंद्र व्ही. धोंडे, मृद व जलसंधारण विभागाचे उपसचिव अरुण गंगाधर गाळवे, नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे उपविभागीय अधिकारी वामन चव्हाण, नंदुरबार येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुनील शिंदे, धुळे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीशकुमार भारे, उपविभागीय अभियंता अभय पाटीदार, कनिष्ठ अभियंता दीपक सैनी व अमोल दिलीप वागुळ, तहसीलदार नितीनकुमार देवरे, दोंडाईचा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, अभियंता शिवनंदन राजपूत नंदुरबार येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रणव धनगर, शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप बागले, दोंडाईचा उपविभागीय कार्यालयाचे राजेश धोलप आणि शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी आदी उपस्थित होते.

    पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यावर भर

    नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी केवळ बंधारे बांधून पाणी अडविणे पुरेसे नाही, तर ते जमिनीत मुरविणेही आवश्यक आहे. तलाव, शेततळी आणि धरणांमध्ये उघड्यावर साठविलेल्या पाण्याचा काही भाग उन्हामुळे वाफ होऊन निघून जातो. मात्र, पाणी जमिनीत मुरल्यास विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरविण्यासाठी योग्य ठिकाणी जलसंधारणाची कामे करावी लागतील, असे पालकमंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

    परिसरात किती पाऊस पडतो, त्यातून किती पाणी उपलब्ध होते, किती वाहून जाते आणि किती जमिनीत मुरविता येते, याचा अचूक हिशेब मांडल्याशिवाय प्रभावी नियोजन करता येणार नाही. यासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करून उपलब्ध बंधारे, शेततळी आणि पाणी मुरविण्याच्या व्यवस्थांची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार दुरुस्ती आणि नवीन कामांचा प्राधान्यक्रम ठरवून पुढील सहा महिन्यांत आवश्यक उपाययोजनांना गती देण्यावर भर राहील, असे पालकमंत्री श्री.रावल यांनी नमूद केले.

    नदी आटण्यामागील कारणांचा शोध घेणार

    यंदा कमी पावसामुळे भेडा नदीसह परिसरातील अनेक नदी-नाले कोरडे पडले आहेत. नदीपात्रातील वाळू उपसा, साचलेला गाळ, जंगलातील माती वाहून येणे आणि नदी-नाल्यांवरील अतिक्रमणे यांमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे अमरावती नदीच्या मुख्य पात्राबरोबरच तिला जोडलेले लहान नाले आणि ओढे मोकळे करणे आवश्यक आहे. मुख्य नदी प्रवाही ठेवायची असेल, तर तिच्या उपनद्या आणि नाल्यांचेही पुनरुज्जीवन करावे लागेल, असे पालकमंत्री श्री.रावल यांनी स्पष्ट केले.

    या भागात 2016 पासून नदीतील पाण्याची पातळी आणि पावसाची नोंद घेतली जात आहे. मात्र, पाण्याची गुणवत्ता आणि नदीपात्रात साचणाऱ्या गाळाचे प्रमाण यांचीही माहिती मिळणे आवश्यक आहे. नदीची खरी स्थिती समजून घेण्यासाठी उपलब्ध नोंदींबरोबरच या बाबींचा अभ्यास करून संपूर्ण परिसरासाठी एकत्रित नियोजन करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केली.

    लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवनाची चळवळ

    नदी पुनरुज्जीवनाचे काम केवळ शासकीय यंत्रणांवर सोपवून चालणार नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. नदी-नाल्यांची स्वच्छता, आवश्यकतेनुसार गाळ काढणे, वृक्षारोपण आणि जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेता येतील. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळेल, असे पालकमंत्री श्री.रावल म्हणाले.

    लातूरमधील मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2018 मध्ये लोकसहभागातून सुमारे 25 किलोमीटर नदीपात्रात कामे करण्यात आली होती. शहादा परिसरातही जलसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. या अनुभवांचा उपयोग करून अमरावती नदीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप उपाययोजना कराव्यात. पूर्वीप्रमाणे नदी उत्सवाची संस्कृती पुन्हा सुरू करून नागरिकांमध्ये नदीविषयी आपुलकी आणि संवर्धनाची भावना निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री.रावल यांनी केले.

    15 ते 20 कोटींच्या प्राथमिक आराखड्याचाही विचार

    अमरावती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी यापूर्वी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सुमारे 15 ते 20 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्याचा विचार करून केंद्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक व्यापक आणि परिणामकारक नियोजन करावे. नदीच्या आसपास वृक्षलागवड, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नैसर्गिक जलप्रवाह सुरक्षित ठेवण्यासाठी विविध विभागांनी एकत्र काम करावे. तसेच ईशा फाउंडेशनसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री.रावल यांनी व्यक्त केली.

    शहरांचा विकास करताना झाडांची तोड, नदी-नाल्यांच्या नैसर्गिक मार्गांमध्ये बदल आणि जलस्रोतांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचे संवर्धन ही केवळ आजची गरज नसून पुढील अनेक पिढ्यांच्या भवितव्याशी जोडलेली जबाबदारी आहे. त्यामुळे नदी पुनरुज्जीवनाकडे तात्पुरता उपाय म्हणून न पाहता सातत्याने चालणारी पर्यावरण संवर्धनाची चळवळ म्हणून पाहिले पाहिजे, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

    ऑक्सिजन पार्क, फ्रूट पार्क आणि ‘बोट नगरी’ची संकल्पना

    अमरावती नदीच्या पुनरुज्जीवनाबरोबरच दोंडाईचा शहराचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी नदीकाठी ऑक्सिजन पार्क आणि राजे छत्रपती उद्यानात फ्रूट पार्क उभारण्याचे नियोजन आहे. या उद्यानात विविध प्रकारची फळझाडे लावण्यात येतील. नागरिकांना उद्यानात बसून फळांचा आस्वाद घेता येईल. मात्र, फळे बाहेर नेण्यास किंवा झाडांचे नुकसान करण्यास मनाई राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

    दोंडाईचा शहराला ‘स्मार्ट दोंडाईचा’बरोबरच ‘बोट नगरी’ म्हणून विकसित करण्याची आपली संकल्पना आहे. शहरात उभारण्यात येणाऱ्या कमानीच्या पुलाची रचना भविष्यात नदीत पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास त्याखालून बोटी जाऊ शकतील, अशा पद्धतीने करण्यात येत आहे. नदीत पाणी टिकल्यास बोटिंग आणि पर्यटनाच्या सुविधा विकसित करता येतील. आधुनिक पूल आणि पर्यटन सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी नदीत पाणी उपलब्ध करून देणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे, असे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

    अमरावती नदीचे पुनरुज्जीवन देशासाठी आदर्श ठरावे

    देशातील विविध भागांत लोकसहभागातून कोरड्या पडलेल्या नद्यांना पुन्हा प्रवाही करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात अशा अनेक उपक्रमांची माहिती मिळाली. नदीपात्रातील प्लास्टिक व कचरा काढणे, जलस्रोतांचे संवर्धन आणि नागरिकांच्या सहभागातून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयोग प्रेरणादायी आहेत. त्याच धर्तीवर अमरावती नदीचे पुनरुज्जीवन संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, अशा पद्धतीने काम करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

    केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आपल्या मागणीची दखल घेऊन तज्ज्ञ पथक पाठविल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करताना पालकमंत्री रावल म्हणाले की, केंद्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांचा सहभाग यांतून या कामाला निश्चितच गती मिळेल. दोंडाईचा नगरपालिकेने शहराच्या विकासासाठी दाखविलेली कृतीशीलता नदी पुनरुज्जीवनासाठीही उपयुक्त ठरेल. येणाऱ्या पिढ्यांना अधिक समृद्ध आणि पाणीदार दोंडाईचा देण्यासाठी सर्वांनी एकत्र कामाला लागावे. अमरावती नदी पुन्हा प्रवाही होईपर्यंत आपण थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

    उद्या संपूर्ण अमरावती नदीची पाहणी करणार

    उद्या ही केंद्राचे पथक संपूर्ण अमरावती नदीची पाहणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

    ००००

    - Advertisement -