राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात स्वागत – महासंवाद

    - Advertisement -

    सिंधुदुर्ग, दि. २१ (जिमाका): भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधा येथे आगमन झाले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे स्वागत करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तुतारी आणि ढोल-ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून रॅलीतील सहभागी पोलीस अधिकारी व रायडर्स यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधून आलेले पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याद्वारे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि अमली पदार्थमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.बांधा येथील स्वागत कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथून आलेल्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले. अमली पदार्थांविरोधातील लढा ही आजच्या काळाची गरज असून, भावी पिढीने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. देश अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रॅलीत सहभागी झालेल्या तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करून सर्व रायडर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील पुढील प्रवासाला सुरुवात होताना मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला.जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूल, पुष्पसेन ज्ञानपीठ, हुमरमळा तसेच जिल्हा मुख्यालय परिसरासह विविध ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधातील लढ्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे तरुण पिढीपर्यंत हा संदेश पोहोचविण्यास मदत झाली. अमली पदार्थांचे व्यसन व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर गंभीर परिणाम घडवते. त्यामुळे तरुणाईला या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

    राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या रॅलीमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना उजाळा मिळण्यासोबतच अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीचा संदेशही व्यापक स्वरूपात पोहोचत आहे.

    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

    ००००

    - Advertisement -