अमळनेरला पाणीप्रश्न पेटला

- Advertisement -

अमळनेर :

गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीप्रश्न पेटला असून, अमळनेर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरूनच पाणी जोडणी करून नगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश एंटरप्रायजेसच्या प्लँटला मुख्याधिकाऱ्यांनी सील केले आहे. या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले असून, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घालून पाणी समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

अमळनेर शहरात नगरपालिकेतर्फे नाशिकच्या प्रथमेश एंटरप्रायजेसला आरओ प्लाँटद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम दिले होते. त्यानुसार ठेकेदाराने एक रुपये दराने हा पुरवठा करायचा होता. मात्र, ठेकेदाराने मुख्य पाइपलाइनवरून जोडणी करून अवैधरित्या कनेक्शन घेतल्याचे पहाणीत मंगळवारी नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी या प्लाँटला सील लावले आहे. या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अभियंता हर्षल सोनवणे यांनी दिले आहेत. शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पालिका प्रशासन व प्रथमेश एंटरप्राइजेस यांच्याशी करारनामा करून जीवनधारा योजनेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी मशिनी लावून १ रुपये लिटरप्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता. काही नगरसेवकांनी मंगळवारी (दि. २५) सिंधी कॉलनीतील प्लँटवर जाऊन पाणीचोरीची बाब पाणीपुरवठा अभियंता हर्षल सोनवणे यांना निदर्शनास अणून दिली. या वेळी उपस्थित नगरसेवकांसह नागरिकांनी ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त केला.

नगरसेवकांकडून ‘हार’चा आहेर
अमळनेर नगरपालिकेत मंगळवारी सकाळी ११ वाजता सत्ताधारी नगरसेवकातील गटातून बंडखोर गटाने अचानक नगराध्यक्षांच्या कार्यालयात येऊन त्यांच्या खुर्चीला पूष्पहार घालून आंदोलन केले. शहरातील पिण्याच्या पाण्याची जी बिकट परिस्थिती झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत आहेत. त्याला नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती माजी आमदार साहेबराव पाटील जबाबदार आहेत, असे या नगरसेवकांनी म्हटले आहे. यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे नगरसेविका रत्नमाला महाजन, कमलबाई पाटील, शितल यादव, संगीता पाटील, नूतन पाटील, राधाबाई पवार, प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, घनश्याम पाटील, संजय भिल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याठिकाणी अवैध नळजोडणी दिल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला होता.

पाण्याअभावी मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित
अमळनेर : शहरातील पाणीटंचाईची झळ विद्यार्थ्यांनाही पोहचली असून, पाण्याअभावी बहुतांश शाळांमध्ये शालेय पोषण आहारातील खिचडी शिजवणे बंद करण्यात आले आहे. पाणीच नसल्याने तूर्त आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय सानेगुरूजी शाळा संस्थाचालकांनी घेतल्याची माहिती संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. नगरपालिका अथवा तहसील प्रशासनाने रोज आहारासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे; तरच आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकतो, असेही घोरपडे यांनी सांगितले. शाळेत सुमारे २३०० विद्यार्थी आहेत. त्यांच्या पोषण आहारासाठी रोज एक हजार लिटर पाणी लागते.

- Advertisement -