मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी त्यांच्या फेसबुकवर ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार आहे, अशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पानसे यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचेही नाव नमूद केले आहे. तसेच ‘करोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी उत्सव साजरा करा’, असे आवाहन अभिजीत पानसे यांनी केले आहे. करोनाचे सर्व नियम पाळून मनसेकडून ही दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.
अभिजीत पानसे यांच्या या फेसबुक पोस्टवर मनसेच्या समर्थकांनी भरभरून प्रतिक्रिया आणि कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील मनसेच्या या दहीहंडीच्या उपक्रमाला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नाहीतर ‘१०० टक्के नाचायला येणार’ अशी कमेन्टही प्रवीण तरडे यांनी या पोस्टवर केली.
करोना काळात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी अजूनही संभ्रम आहे. याबाबत राज्य सरकारने काही धोरण जाहीर करण्याआधीच मनसेने ही विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेने दहीहंडी उत्सवासाठी घेतलेल्या या भूमिकेची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. मनसेने घेतलेल्या या भूमिकेवर राज्य सरकार आणि पोलिस काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.