आंबळे धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा – मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    - Advertisement -




    मुंबई, दि. २६ : आंबळे धरणग्रस्तांचे प्रश्न केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक आणि मानवी बाजू लक्षात घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    सातारा जिल्ह्यातील आंबळे धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्यासह जलसंपदा व पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री  जाधव-पाटील यांनी धरणग्रस्तांच्या मागण्या, पुनर्वसनाशी संबंधित प्रश्न आणि प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला.  ते म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची वस्तुस्थिती तपासून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, या दृष्टीने कार्यवाही करावी.

    मंत्री जाधव-पाटील म्हणाले, पुनर्वसनाशी संबंधित प्रकरणांमध्ये अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा आणि नियमानुसार त्यावर योग्य तोडगा काढून धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ







    - Advertisement -